आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शपथविधीला अनुपस्थिती:पहिल्यांदा खासदार होऊनही शपथविधीमध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीत फौजिया खान, असा आहे खासदारकीपर्यंतचा प्रवास

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज खासदारकीची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामधील केवळ सहा जणांनी शपथ घेतली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या आज शपथ घेऊ शकल्या नाहीत. दरम्यान त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तवर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच शपथविधीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता.

फार्महाऊसवर आहेत क्वारंटाइन

मार्च महिन्यातच फौजिया खान यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाली. आज सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपधविधी पार पडला. मात्र यामध्ये फौजिया खान उपस्थित राहू शकल्या नाहीत. सोमवारी फौजिया खान यांच्या अँटीजन टेस्टमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान यापूर्वीच त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांनी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतला होता. आता फौजिया खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या रुग्णालयात दाखल झालेल्या नाहीत. परभणी शहरापासून जवळ एक किलो मीटर अंतरावर नांदखेडा रोडवर त्यांचे फार्महाऊस आहे. तिथेच त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. दोन डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान त्यांचे पती तहसिन खान यांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

परभणी नगराध्यक्षाच्या निवडणुकीतून झाली राजकारणाची सुरुवात
63 वर्षीय फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. दरम्यान परभणी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद भूषवले आहे. तसेच आघाडी शासनाच्या काळात 2008 ते 2014 दरम्यान राज्यमंत्री राहिलेल्या फौजिया खान या काही काळ परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील राहिलेल्या आहेत.

दोन वेळा महाराष्ट्र विधानसपरिषदेवर सदस्य राहिलेल्या आहेत
राजकारणात येण्यापूर्वी फौजिया खान या प्राध्यापक होत्या. त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे आणि त्यांचे शिक्षण पाहून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर संधी दिली होती. उत्तम वक्तृत्वगुण असलेल्या फौजिया खान यांनी त्यांच्या कार्यकौशल्यातून अल्पावधीतच पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या दोन वेळा महाराष्ट्र विधानसपरिषदेवर सदस्य राहिलेल्या आहेत.