आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला रानभाजी महोत्सव:93 प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या खरेदीचा लुटला आनंद, रानभाजी महोत्सवास शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद

औरंगाबाद (संतोष देशमुख )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्याला शहरवासीयांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. 93 प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या खरेदीचा ग्राहकांनी आनंद लुटला. अशा प्रकारचे महोत्सव महिन्यात एकदा भरवाव्येत, अशा प्रकारची मागणी देखील ग्राहकांनी केली आहे.

कोरोना संसर्ग व लॉकडाऊन मुळे लोक हैराण झाले आहेत. याच कारणामुळे यंदा धान्य महोत्सव, आंबा महोत्सव होऊ शकला नाही. यामुळे नागरिकांना वर्षभराचे धान्य खरेदी करण्यासाठी विविध बाजारपेठेत जावे लागले. चार महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर कृषी विभागाच्या वतीने आगळावेगळा रानभाज्या महोत्सवचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. विक्रीसाठी प्रांगणात व रानभाज्यांच्या माहितीसाठी हॉलमध्ये अशा दोन ठिकाणी हा महोत्सव भरवण्यात आला होता. याच बरोबर रानमेवा पाककृती स्पर्धा देखील घेण्यात आली. त्याला शेतकरी व ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास रानभाज्या महोत्सवास सुरुवात झाली होती. त्यानंतर अवघ्या अडीच तासांत ग्राहकांनी विविध रानभाज्यांची खरेदी केली. त्यांना माहिती असलेल्या व माहिती नसलेल्या भाज्यांची ओळख करून घेत सर्वांनी खरेदीला महत्त्व दिले.

सर्वच रानभाज्यांनी वेधले लक्ष

कर्टाेली, अळंबी, आघाडा, अमरकंद, आचकंद, कोवळे बांबू, बांबूचे कोंब, महाळुंग, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, कुसरा, कुई, भुईपालक, घोळ, तरोटा, कुरडू, गुळवेल, अंबाडी भाजी भाकरी, कासली, फांग, अरवी, तांदुळ कुंद्रा, काळा म्हैस वेल, चवळीच्या डेऱ्या, चिवळ, सराटा, बडकी, लोधी, वागोटी, हळंदा, आळूचे पान, समिंद शोक पानं, गावरण लसून, कांदा, असे विविध प्रकारचे ९३ रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.

खुप आनंद झाला

कर्टाेल्याची भाजी खूप आवडते. अनेक वर्षांनंतर आज ती भेटली. त्या शिवाय विविध रानभाज्यांची माहिती मिळाली व खरेदी करता आले. आवडीच्या भाज्या मिळाल्याने खूप आनंद झाला. अशा प्रकारचे महोत्सव वारंवार घेतले जावेत, असे वाटते. - सुरेखा कलबुर्गे, गृहिणी

हक्काची बाजारपेठ मिळावी

नैसर्गिकरित्या रानभाज्या येतात, पण अतिशय दुर्मिळ रानभाज्या आम्ही शेतातही पिकवण्याची किमया आम्ही करत आहोत. हक्काची बाजारपेठ व भाव चांगला मिळाला तर रानभाज्यांचे संरक्षण व संवर्धन होईल व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील. - नारायण वाघ, शेतकरी

जंगलात, शेतात व शेताच्या बांधावर, माळरानावर नैसर्गिकरित्या बहुगुणी रानभाज्या येतात. पण जागतिकिकरणामुळे नैसर्गिक देणगीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे व रानभाज्यांचे महत्त्व सर्वांना माहिती व्हावे म्हणून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरेल. कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल. रानभाज्यातील गुणधर्म लक्षात घेऊन तालुका पातळीवर महोत्सव, पाककृती स्पर्धेचे आयोजन करून ९३ पेक्षा अधिक राजभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी सांगितले.

डी. एल. जाधव, कृषी सहसंचालक, औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...