आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाजींची टोलेबाजी:‘औरंगाबादमे आओ बीबी का मकबरा देखने’ असे म्हणाल तर कोण येणार?, दानवेंचा इम्तियाज यांना टोला

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर ते मनमाड लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ९५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून या कामाला मंजुरी घेऊन ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनसाठी २५० कोटी आणि जालन्यासाठी १७५ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागविल्या असून, जुलैमध्ये वर्कऑर्डर देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांचा विविध संघटनांतर्फे करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दानवे यांनी इम्तियाज जलील यांंना ‘औरंगाबाद’ म्हणून नव्हे, तर ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हणून मागण्या करा, प्रश्न सुटतील, असे म्हणत टोला लगावला.

या वेळी खासदार इम्तियाज जलील, सहकारमंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आदींची उपस्थिती होती. या वेळी अर्पित सावे आणि मुकुंद कुलकर्णी यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत सादरीकरण करून मागण्या मांडल्या.

रेल्वे राज्यमंत्री दानवेंची टोलेबाजी

खासदार इम्तियाज जलील लोकसभेत ‘छत्रपती संभाजीनगर’चे प्रश्न विचारण्याऐवजी ‘औरंगाबाद’ म्हणून विचारतात. येत्या अधिवेशनात ‘छत्रपती संभाजीनगर से पुंछ रहा हूं,’ असे विचाराल तेव्हा सगळ्या मागण्या मान्य होतील. मागण्या मांडताना त्या शहरातील वातावरण कसे आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. तुम्ही ‘औरंगाबादमे आओ बीबी का मकबरा देखने’ असे म्हणाल तर कोण येणार?, असे म्हणत खासदार इम्तियाज यांना दानवे यांनी टोमणा मारला.

रेल्वेच्या विकासाची चिंता करू नका

खासदार इम्तियाज यांनी, ‘दानवे वर्षभरात रेल्वेचा विकास करतील, अशी कोपरखळी मारली होती. त्यावर दानवे म्हणाले की, या महिन्यात एअर कनेक्टिव्हिटी कमी झाली. यासंदर्भात आम्ही मंत्र्यांना भेटणार आहोत. रेल्वेबाबत खासदार बोलले, मात्र मी २५ वर्षे खासदार, १० वर्षे आमदार होतो. ३५ वर्षांत काय मागत होतो, तर मनमाड-सिकंदराबाद दुहेरीकरण आणि पीटलाइन. त्यासाठी आम्ही आंदोलन करायचो. आता मोदी यांच्यामुळे रेल्वेचा विकास होत आहे. मनमाड-छत्रपती संभाजीनगर दुहेरीकरण १,२०० कोटींचे होते. आता हा प्रस्ताव ९५० कोटींपर्यंत कमी केला आहे. त्याला लवकरच मान्यता देऊन कामे सुरू केली जाणार आहेत. जालना येथे पीटलाइनचे काम सुरू झाले आहे.

संवेदनशील नागरिकांमुळे लोकशाही यशस्वी : बिर्ला

सत्कारला उत्तर देताना लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला म्हणाले, गेल्या ७५ वर्षांत आपण विकास केला. आता आपल्याला गतीने प्रगती करायची आहे. जगासाठी भारत आता आर्थिक डेस्टिनेशन बनले आहे. मात्र, भारतात नागरिकांमधील संवेदनशीलपणा, संकटात एकमेकांना मदत करण्याची भावना, यामुळेच लोकशाही यशस्वी झाली.

भारताची आर्थिक प्रगती होत आहे. बौद्धिक क्षमता, संशोधनाच्या बळावर विकसित देशातही भारताचे युवक नेतृत्व करत आहेत. जगातील प्रगतीमध्ये भारतीय डॉक्टर, इंजिनिअर तरुणांचे योगदान आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी जास्त प्रयत्न करतात. प्रत्येक क्षेत्रात आपण स्वावलंबी झाले पाहिजे. आपली संस्कृती, मानवी संवेदना, संकटात मदत करण्याची मानसिकता, ही आपली ताकद आहे. त्यामुळे आपली लोकशाही यशस्वी होत आहे.

एअर कनेक्टिव्हिटी वाढवा : खा. इम्तियाज

खासदार इम्तियाज म्हणाले की, वेरूळ, अजिंठा अशी दोन जागतिक वारसास्थळे आहेत, पण विमान कनेक्टिव्हिटी नाही. सकाळचे विमान आहे, तर संध्याकाळचे रद्द केले. एअर कनेक्टिव्हिटी वाढवली, तरच शहरासह जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग क्षेत्राचा विकास होईल.

डीएमआयसीसाठी प्रयत्न व्हावेत : सावे

​​​​​​​डीएमआयसी प्रकल्प पूर्ण झाला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून आणखी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी दिल्लीत आणखी एक बैठक घ्यावी. नवीन उद्योग आले तर गतीने विकास होईल, अशी मागणी सहकारमंत्री सावे यांनी केली.