आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन' असे रॅप रचून ते गाणाऱ्या राज मुंगासे याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मुंगासेला आता अंबरनाथ पोलिसांच्या हाती सोपवतील, असे संकेतही त्यांनी ट्विटमध्ये दिले आहेत.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासे यांच्या रॅपचे ट्विट करून कौतुक केले होते. त्यावेळीही त्यांनी मुंगासे यांच्यावर पोलिस कारवाई करतील, अशी भीती व्यक्त केली होती.
कोण केली तक्रार?
शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटीच्या सदस्य असलेल्या स्नेहल कांबळे यांनी या रॅपविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून मुंगासे याच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपरने सरकार विरुद्ध बदनामीकारक रॅप केले असल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे. हा रॅपर मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे.
काय आहे रॅपमध्ये?
राम मुंगासेच्या रॅपचे बोल असे आहेत, 'चोर आले. चोर आले…चोर आले.. एकदम ओके होऊन, कसे बघा चोर आले. पन्नास खोके घेऊन किती चोर आले. एकदम ओके होऊन. अरे छक्क्यांच्या मिशीला ताव बघा, ह्यांनी पाठीवर दिला आपल्या घाव बघा. गेले सुरत गुवाहट्टी अन् गोवा कसे ढोसली दारू, अन म्हणला हा डाव बघा, अरे पळकुटे चोर झाले, छातीमध्ये छप्पन चोरलास छप्पन चोरलास पक्ष हयांनी चोरतील बाप पण आळया पडुन पडतील हा महाराष्ट्राचा श्राप आहे. मराठी माणुस हा सगळ्यांचा बाप आहे. चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा चोर आले. एकदम ओक होऊन कसे बघा चोर आले', असा उल्लेख रॅपमध्ये आहे.
आव्हाडांचे ट्विट काय?
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मुंगासे यांना अटक झाल्याचे म्हटले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटले म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावे. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा, हे पोलिसांनी सिद्ध करावे. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसते. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलिसी राज नाही.
विरोधकांचा पाठिंबा
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते विधानसभेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील हे भारी होत म्हणत राम मुंगासे याने तयार केलेल्या रॅपचा व्हिडिओ आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर हा व्हिडिओ ट्विट करत 'ह्या कलाकाराला सलाम, पोलिसांना विनंती ह्याला अटक करू नका', असे म्हणत त्याच्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.