आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रातरागिणीचा वर्धापन दिन साजरा:भयमुक्त जीवनासाठी अंधारावर चालून जाण्याचा संकल्प

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोना संकटामुळे सारे जग अंधारून गेले आहे. येणारा प्रत्येक क्षण कठीण असल्याचे अनेकांना वाटत आहे. पण हिंमत हरू नका. ‘मुश्किल बहोत है … लेकिन वक्त ही तो है.... गुजर जाएगा’ असा ठाम विश्वास ‘दिव्य मराठी’ रातरागिणी उपक्रमाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात देवमुद्रा संस्थेच्या नृत्यांगनांनी दिला. (छाया : रवी खंडाळकर) - Divya Marathi
कोरोना संकटामुळे सारे जग अंधारून गेले आहे. येणारा प्रत्येक क्षण कठीण असल्याचे अनेकांना वाटत आहे. पण हिंमत हरू नका. ‘मुश्किल बहोत है … लेकिन वक्त ही तो है.... गुजर जाएगा’ असा ठाम विश्वास ‘दिव्य मराठी’ रातरागिणी उपक्रमाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात देवमुद्रा संस्थेच्या नृत्यांगनांनी दिला. (छाया : रवी खंडाळकर)

गेल्या वर्षी २२ डिसेंबरच्या रात्री दैनिक दिव्य मराठीच्या वतीने “रातरागिणी’ नाइट वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला राज्यभरातून महिलांनी प्रतिसाद देत अंधारावर मात केली. तसेच ठिकठिकाणी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. “रातरागिणी’च्या वर्धापन दिनामित्त यंदाच्या वर्षी कोरोनाचे नियम पाळून दिव्य मराठीच्या विविध आवृत्ती कार्यालयांत मोजक्या महिलांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी “दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी चित्रफितीद्वारे उपक्रमामागील उद्देश सांगितला.

सर्वांसोबत पुढे जायचे आहे : संजय आवटे
वर्षभरापूर्वी झालेल्या रातरागिणी कार्यक्रमास राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, यासह अंधारावर मिळवलेला विजय हा व्यवस्थेला मिळालेला एक प्रश्न आहे. यासाठी या महिला अंधारावर मात करीत निघाल्या होत्या. ही आशेची वात कायम तेवत आहे. सर्वांसोबत पुढे जायचे आहे, नवी उमेद करायची आहे, असा विश्वास दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी उपस्थितांना डिजिटल माध्यमातून दिला.

नाशिक : बंधने नकाेत, आम्हाला अधिकार हवा
‘बंधने नकाेत, अधिकार हवा’ हा निर्धार व्यक्त करत नाशिक शहरातील विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘दिव्य मराठी’ रातरागिणीचा वर्षपूर्ती साेहळा साजरा केला. वर्षातील सर्वात माेठी रात्र असलेल्या २२ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला नाशिक फ्लाॅवर पार्कमध्ये महिलांनी जल्लाेष केला.

अत्याचारांची उत्तरं महिलांवर बंधनं लादण्यात नाहीत तर त्यांना माणूस म्हणून अवकाश मिळावा या उद्देशाने रात्रीवरीलही त्यांचा अधिकार सर्वमान्य व्हावा या उद्देशाने वर्षातील सर्वात माेठ्या रात्री या निर्धाराचा नाशिककर महिलांनी पुनरुच्चार केला. हैदराबाद आणि हिंगणघाटच्या घटनेनंतर गेल्या वर्षी ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावर राज्यभरातील महिलांनी रातरागिणी हाेत नाइट वाॅक केला. यंदा काेविडमुळे आलेल्या मर्यादेत नाशिककर महिलांनी यात प्रातिनिधिक सहभाग घेतला. निवडक महिलांनी भयावर मात करण्याचे त्यांचे अनुभव मांडले. निवासी संपादक जयप्रकाश पवार आणि युनिट हेड झुबेर मलिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपस्थित महिलांच्या उपस्थितीत केक कापून रातरागिणीच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात आले.

जळगाव : महिलांनी केला आत्मनिर्भयतेचा जागर
अंधाराला भेदून स्वतंत्र मुक्त जगण्याची उमेद कायम ठेवत संघटित होत अंधारावर चालून जाण्याचा संकल्प रातरागिणींनी केला. सोमवारी ‘दिव्य मराठी’च्या ‘ मौन सोडू, चला बोलू ’ या अभियानांंतर्गत रातरागिणी या अभियानाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येस आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी या वेळी आत्मनिर्भयतेचा जागर केला.

सुरुवातीस ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे यांनी महिलांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण व्हावी, दबलेली ऊर्जा जागृत करण्यासाठी दिव्य मराठीने यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांत उत्तम कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय व्हावा यासह त्यांच्यामधील न्यूनगंडाची भावना दूर व्हावी व त्यातून त्यांनी अंधाराला भेदत पहिले पाऊल टाकावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. अंधकारावर मात करण्याची क्षमता महिलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी महिलांनी पुढे टाकलेल्या पावलांचे हे ‘सेेलिब्रेशन’ आहे. असे हे पाऊल कायम पुढे पडत राहील यासाठी ‘दिव्य मराठी’ कायम सोबत असल्याचाही विश्वास व्यक्त केला.

अकोला : रातरागिणींकडून वर्षपूर्तीचा जल्लोष
शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी सोमवारी रात्री एकत्र येत दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात रातरागिणीच्या वर्धापन दिन साजरा केला. रात्रंदिवस काम करताना आलेल्या अनुभवांचे कथन करत याहीपुढे अंधारावर कणखरपणे मात करत चालून जाण्याचा निर्धार केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांची या कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून उपस्थिती होती. सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे दै. दिव्य मराठी महिला सक्षमीकरणात मोलाची भूमिका बजावत आहे. शहरातील शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, साहित्य, सांस्कृतिक, शासकीय सेवा आदी विविध क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रातरागिणीचा केक कापला.

नगर : ‘रातरागिणी’मुळे स्त्री सक्षमीकरणाला बळ
जगभरात महिलांच्या शक्तीला प्रोत्साहन दिले जात आहे, पण अजूनही अनेक ठिकाणी महिलांवर अन्याय होतो. यापूर्वी महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. अंधार पडला की महिलेने घरी जावे, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘रातरागिणी’ नाइट वॉक संकल्पनेमुळे स्त्री सक्षमीकरणाला बळ मिळाले आहे, असे अहमदनगरच्या रातरागिणींनी सोमवारी सांगितले.

वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला रातरागिणींनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात केक कापून सेलिब्रेशन केले. महिला अत्याचारांच्या खटल्यांचे काम पाहणाऱ्या विशेष सरकारी वकील मनीषा केळगेंद्रे-शिंदे, ‘भरोसा’ महिला सेलच्या सदस्य तथा ऊर्जिता सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष संध्या मेढे, ‘श्वेता तसेच आर्या देवचक्के या वेळी उपस्थित होत्या. ब्युरो चिफ अनिरुद्ध देवचक्के यांनी रातरागिणी संकल्पनेचा उद्देश स्पष्ट केला.

सोलापूर : महिला, तरुणींनी सांगितले राेमांचक अनुभव
सोलापूर | शहरात एका मंगल कार्यालयात रातरागिणी एकत्र आल्या होत्या. गेल्या वर्षी त्या अंधाऱ्या रात्री चालून जाताना आलेले रोमांचक अनुभव कथन केले. त्यांच्यात तोच आत्मविश्वास होता. राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अर्थातच मशाल पेटवून. सुरुवातीला मेघांबरी हुल्लेनवरू यांनी “दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ हे गीत सादर केले. त्यानंतर उपस्थित महिलांमध्ये चैतन्य निर्माण झाले. अंधाराला भेदून नारीशक्ती एकवटली पाहिजे, हेच अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले. निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी प्रास्ताविक केले. युनिट हेड नौशाद शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अश्विनी तडवळकर आणि माधवी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...