आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रातरागिणी वर्षपूर्ती:भीतीचं ‘पोस्टमाॅर्टेम’ करत केली अंधारावर मात, पुणे जिल्ह्यातील रातरागिणीची कहाणी

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 वर्षांपासून शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या भोरच्या ‘शीतल’
  • शीतल यांनी आत्तापर्यंत केलेत पाच ते सहा हजार पोस्टमाॅर्टेम

बारा वर्षांची होते तेव्हापासून ‘पोस्टमाॅर्टेम’ करतेय. आधी खूप भीती वाटायची. रात्र-रात्र झोप यायची नाही. पण नंतर जिद्दीने मी माझ्या भीतीवर मात केली. ‘मृतदेहांची भीती मी वाटून घेतली असती तर माझं कुटुंब वाऱ्यावर पडलं असतं. माझ्या पाठच्या भावंडांची शिक्षणं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा झाला असता? मागील १८ वर्षांपासून ‘पोस्टमाॅर्टेम’ करणाऱ्या व अंधारावर मात करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोरच्या शीतल रामलाल चव्हाण या ‘रातरागिणी’ची कहाणी, त्यांच्याच शब्दात...

आम्ही मूळ भोर तालुक्यातले. वडील उपजिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचारी आणि शवविच्छेदनात सहायक म्हणून काम करायचे. आई मोलमजुरी करून संसाराला हातभार लावायची. भावंडांमध्ये मीच मोठी होते. माझ्यासह पाच बहिणी आणि दोन भाऊ असं आमचं कुटुंब. माझं शिक्षण दहावीपर्यंत झालं. पुढं खूप शिकावं वाटंत होतं. पण जमलं नाही. अशातच एक दिवस वडिलांसोबत मी जिल्हा रुग्णालयात गेले होते. वडिलांनी मला शवगृहात नेलं. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून मी मृतदेह पाहत होते. पहिल्यांदा तर भीती, किळस अशा भावना दाटून आल्या. मात्र आपल्याला भीती वाटून चालणार नाही. शिक्षणाअभावी दुसरं काही काम मिळण्याची शक्यताच नव्हती. मग वडिलांच्या सोबत राहून शवविच्छेदनाचं काम शिकून घेतलं. प्रत्येकाच्या मनात भीती असते. पण, आपण त्यावर कशी मात करतो ते महत्त्वाचं असतं. मनातून भीती काढली अन् आता कित्येक मृतदेहांचे मी पोस्टमाॅर्टेम केलंय.

आसपासच्या गावांत जाऊन शवविच्छेदन
शिरवळ, वरंधाघाट, खंडाळा, सासवड, वेल्हा अशा आसपासच्या गावांत जाऊनही मला शवविच्छेदन करावं लागतं. त्यासाठी रात्री-अपरात्री घराबाहेर पडावं लागतं. अनेकदा तर विनामोबदलाही हे काम करावं लागलं. भाटघर धरणात होडी उलटून झालेला अपघात, मांढरदेवी दुर्घटना अशा प्रसंगी जड अंत:करणाने कर्तव्य करावं लागलं. अशा प्रसंगी तुमच्यावर मोठी जबाबदारी असते. ती टाळता येत नाही. या कामात तुम्हाला खंबीर रहावंच लागतं. कधी माळरानावर, कधी ताडपत्री लावलेल्या शेडमध्ये तर कधी गंभीर मृतदेहांचं प्रत्यक्ष घटनास्थळी शवविच्छेदनही करावं लागतं.

यंत्रणेला उशिरा जाग
गेल्या अठरा वर्षांपासून मी सेवाभावे हे काम करत आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी पुरस्कार दिल्यानंतर मला सरकारी सेवेत सामावून घेण्यात आलं. संस्थांनी दखल घेतल्यानंतर सरकारी यंत्रणांना जाग आल्याची खंत आहे. समाजातील माझ्यासारख्या महिलांना सरकार आणि समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
.
या क्षेत्रात काम करताना नजर मरून गेलेली असली तरी कधी कधी मन मात्र व्यथित होतं. दगडावर डोकं आपटून केलेली नवजात बाळाची हत्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीनं केलेली आत्महत्या हे दोन प्रसंग आजही माझं मन हेलावून टाकतात. या दोन मृतदेहांचं शवविच्छेदन करणं मानसिक-भावनिकदृष्ट्या कठीण होतं.

शब्दांकन : वंदना धनेश्वर, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...