आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. नांदेड, हिंगाेली, परभणी, बीड, लातूर आदी जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झाेडपून काढले. नांदेडमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीने रौद्ररूप धारण केले. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले. मुखेडमध्ये कार वाहून गेली. यात तिघे वाहून गेले. एक जण वाचला. याच तालुक्यात आणखी एक वाहून गेल्याची माहिती आहे. याशिवाय हिंगोली जिल्ह्यात दोघे वाहून गेले, तर एका अनोळखीचा मृतदेह आढळला.परभणी जिल्ह्यातही पावसाने मोठे नुकसान झाले.
बीड जिल्ह्यातही धरणे ओव्हरफ्लो झाली असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धबधबा पाहायला गेलेला एक वाहून गेला तर एकाला वाचवले आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये २ जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. औरंगाबाद जिल्ह्यात पाचोड परिसरात मंगळवारी सांयकाळी पाच वाजेपासून ढगफुटीसदृश पावसाने तीन तास जोरदार झोडपल्याने पाचोड येथील पोलिस कॉलनीसह औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. पिशोर परिसरात तसेच कन्नडच्या काही भागात चांगला पाऊस झाला. हाताताेंडाशी आलेली कापूस, तूर, मूग, मका, बाजरी ही पिके अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झाली. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीसह परिसरात मंगळवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस पडल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. खालापुरी गावाजवळ बहिरी नाल्याला पूर आल्याने तीर्थपुरी ते कुंभार पिंपळगावचा संपर्क तुटला.
परभणी : १३ गावांचा संपर्क तुटला, मानवत तालुक्यात एक गेला वाहून
मागील २४ तासांत ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील विविध भागात पाणी शिरले होते. ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पालम तालुक्यातील गळाटी व लेंडी या नद्यांना पूर आला. यामुळे नदी पलीकडील १३ गावांचा संपर्क तुटला. चाटोरी येथे गळाटी नदीला पूर आला. गंगाखेड येथे गोदावरी नदीचे दुथडी भरून वाहत आहे. मानवत तालुक्यातील कोल्हापाटी येथील नदीला पूर आल्याने महामार्ग वाहतूक ठप्प झाली. सेलू तालुक्यातील कुपटा येथे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून चालताना दोन अतिउत्साही युवक वाहून जात होते. पण पोहता येत असल्याने दोघांचा जीव वाचला. दरम्यान, मानवत तालुक्यातील पोंहडूळ येथे नदीला पूर आल्याने चार युवक वाहून गेले. तिघे सापडले असून योगेश अनंत धोपटे (२७) हा नदीच्या पुरात वाहून गेला. तो अद्याप बेपत्ता आहे.
धारूर : आरणवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडला
सोमवारी आरणवाडी साठवण तलावाच्या भिंतीचा मातीचा भाग खचून भगदाड पडल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाली. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर राहिल्याने कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, उपअभियंता व्ही. बी. हत्ते, शाखा अभियंता विक्रमसिंह चव्हाण यांनी तलावाची पाहणी केली. तलाव तुडुंब भरल्यामुळे पाणी पातळी वाढल्याचे लक्षात येताच तलावाचा सांडवा दुसऱ्यांना फोडण्याचा निर्णय घेतला. दुपारी चार वाजेच्या सुमारास तेलगाव येथून पोकलेन मागवून सांडव्याचा काही भाग फोडून पाण्याचा विसर्ग वाढवला. सांडवा फोडल्याने तलावातील पाणी कमी झाले. दरम्यान, तहसीलदार वंदना शेडोळकर, पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह राज्य राखीव दलाचे दंगलग्रस्त पथक दाखल केले होते.
साेशल मीडियातून आवाहन : आरणवाडी तलाव भरल्याने गावांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे सांडवा फोडण्यात येत असून सतर्कतेचे आवाहन साेशल मीडियाद्वारे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले हाेते.
बीड : गेवराई तालुक्यामध्ये चार प्रकल्प फुटले
जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस होता. गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे मारफळा, भेंड खुर्द, भेंड बुद्रुक व जातेगाव येथील ४ प्रकल्प फुटले असून पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू आहे.गेवराई तालुक्यात अमृता नदीला पूर आल्याने पौळाचीवाडी जवळील पूल खचला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. केज, अंबाजोगाई, पाटोदा, परळीतही जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. कपिलधार येथील धबधबा पाहण्यासाठी दुचाकीवरून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एक मुलगा बेपत्ता झाला. तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. सिमेंट रोडच्या पुलावरून दुचाकी वाहून गेली. कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांनी यशराज कुडके (१७, रा. कबाड गल्ली, बीड) आणि त्याचा मित्र ओंकार विभुते (१७ रा. माळीवेस,बीड) या दोन्ही मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील ओंकार विभुते याला वाचवण्यात यश आले. पण यशराज अद्याप बेपत्ता आहे.
लातूर : जिल्ह्यात नद्या दुथडी, दोन पाझर तलाव फुटले
जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसला. अहमदपूर तालुक्यातील चिखली शिवारातील दोन पाझर तलाव फुटले. चिखली गावात पाणी शिरले आहे. तर अहमदपूर तालुक्यातील मावळगाव येथे ओढ्याच्या पाण्यात बंडू सोपान केंद्रे (४८) व हगदळ येथे मारोती मल्हारी कांबळे (४०) वाहून गेले. माराेती यांचा मृतदेह सापडला आहे. चिखली गावात काही जनावरे वाहून गेली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा नदी, तेरणा नदी, तावरजा, मन्यार नदी, तिरू नदी, देवनदी यासह अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या. जिल्ह्यातून जवळपास १४५ किमी अंतर पार करणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळेच मांजरा नदीवरील ११ बॅरेजेस काठोकाठ भरले. तिरु नदीची पाणी पातळी वाढली असून त्यामुळे जळकोट तालुक्यातील काही गावाचा संपर्क तुटलेला आहे. रेणा मध्यम प्रकल्प तीन वर्षा नंतर १०० टक्के भरला. बंडू केंद्रे 48 अहमदपूर तालुक्यात वाहून गेला
औरंगाबाद : दरड काेसळल्याने नागद-गाैताळ्याचा म्हैस घाट बंद
भिजपावसामुळे नागद-गाैताळ्या दरम्यानच्या म्हैस घाटात दरड काेसळल्याने मार्ग मंगळवारी पहाटेपासून बंद अाहे. मंगळवारी दिवसभर दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू हाेते. दरम्यान नुकतीच चाळीसगाव घाटात दरड काेसळल्याने धुळे-अाैरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग बंद असून म्हैस घाट हा पर्यायी मार्ग हाेता. मात्र मंगळवारी पहाटेपासून हा घाट ही बंद झाल्याने धुळे मार्गे चाळीसगावहून अाैरंगाबाद येणाऱ्या वाहनांना नागद, साेयगाव किंवा चाळीसगाव नांदगावमार्गे फेरा मारावा लागत अाहे. हा फेरा औरंगाबाद जाण्यासाठी नांदगाव किंवा सोयगाव गाठावे लागणार असून ८० ते ९० किमी फेरा पडणार आहे.
नांदेड : धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पूरस्थिती, शहरांतील पूल पाण्याखाली गेले
नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीत निम्न दुधना, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगण राज्यातील पोचमपाड धरणही १०० टक्के भरले. तेथून ३ लाख ६ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. हा प्रकल्प भरल्याने गोदावरीत फुगवटा निर्माण होत आहे.
मुखेड तालुक्यात कार (एमएच २० डीजे ६९२५) वाहून गेली. यात दोघेही बेपत्ता असून एक जण झाडावर बसल्याने वाचला. याच तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मेथी येथे यादवराव जळबा हिवराळे (५५) वाहून गेले. त्यांचा मृतदेह काही अंतरावर आढळला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये स्थिती गंभीर बनली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
शहरात गोवर्धन घाट स्मशानभूमी व नाव घाट पूल पाण्याखाली गेला. दोन दिवसांत हिमायतनगरमध्ये वीज पडून दोन बैल दगावले. कंधारमध्ये एक म्हैस वाहून गेली. बिलोलीत एक गाय व वासरू वाहून गेले. नायगावमध्ये कुंटूर व मुखेड तालुक्यात दोन जणांना वाचवले.विष्णुपुरीच्या १४ दरवाजांतून २ लाख २१ हजार ४८९ हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे.
हिंगोली : वाहून गेलेले दोघे बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला
सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात उद्धव श्रीरंग काळे (३५) हा मजूर वाहून गेल्याची घटना घडली. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. उद्धव हे पत्नी व तीन मुलांसह बरडा येथे राहतात. शेतीत मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालतो. सोमवारी दुपारी ४ वाजता ते मुलगा सुभाषसोबत गावाजवळून दुथडी भरून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पात्राकडे आले होते. तितक्यात ते प्रवाहात वाहून गेले. सुभाषने आरडाओरड केली. ग्रामस्थ मदतीला धावले. पण तोपर्यंत ते दिसेनासे झाले. दरम्यान, हिंगोली येथील कयाधू नदीपात्रात मंगळवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील लखन प्रकाश गजभारे (२३) ओढ्याच्या पुरात वाहून गेला. सध्या तो बेपत्ता आहे.
परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी येथे पुराच्या पाण्यात बस बंद पडल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांना पकडून पाण्यातून वाट काढत सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर पडत केरवाडी गावात गेेेले. या बसमध्ये अंदाजे १० ते १२ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
तलाव फुटले, गावे, शहरांत पाणीच पाणी
परभणी : जिल्ह्यातील पालम तालुक्यात बनवस येथे नदीला पूर आल्याने गावातील शेकडो घरांत पाणी शिरले होते. दुसऱ्या छायाचित्रात नागद घाटात बचावकार्य युद्धपातळीवर केले जात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.