आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बोगस बियाणे कंपन्यांविरोधात रविकांत तुपकर आक्रमक, कृषी कार्यालयात मांडला ठिय्या

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्यालयात तणावाची परिस्थिती, भरपाई मिळेपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची घेतली भूमिका
  • दैनिक दिव्य मराठी ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करून यातील सावळा गोंधळ उघडा पाडला आहे

जिल्हाभरात शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. पेरलेलं उगवलं नाही आणि उगवलेलं जगल नाही. त्यामुळे शेतकरी त्रासले आहे. जिल्हाभरातून या संदर्भात येणाऱ्या तक्रारी पाहता रविकांत तुपकर यांनी आज २९ जून रोजी कृषी कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारत नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह कार्यालयातच ठिय्या मांडला आणि शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई मिळेपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण चांगलेच तापले. वेळप्रसंगी कार्यालय फोडू आणि ग्रीनगोल्ड व इतर बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांचे गोडावून पेटवून देऊ असाही इशारा त्यांनी दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरुच होते. दैनिक दिव्य मराठीने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करून यातील सावळा गोंधळ उघडा पाडला आहे.

यावर्षी पावसाला वेळेवर सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पेरलेले बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात सर्वच भागातून शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी येऊ लागल्या. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरवर दररोज बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारींचा पाऊस पडू लागला तर आज काही शेतकरी थेट रविकांत तुपकरांकडे तक्रारी घेऊन आले असता त्यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांना घेऊन कृषी विभागाचे कार्यालय गाठले. बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. गतवर्षी अतिवृष्टीने मारले आणि त्यानंतर कोरोनाने शेतकऱ्यांना आणखीनच आर्थिक संकटात लोटले. कशीबशी तडजोड करुन, उसणवार करुन, कर्ज काढून शेतकऱ्यांची पेरणी केली मात्र पेरल्यानंतर उगवलेच नाही. बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्हाभरातून सहाशेंहून अधिक शेतकऱ्यांनी बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या मात्र अद्याप एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. चिखली तालुक्यातील कोलारा, करतवाडी, करवंड यासह इतर काही गावांमधील शेतकऱ्यांनी ग्रिनगोल्ड कंपनीचे बियाणे बोगस निघाल्याची तक्रारी करुन तीन दिवसांपूर्वी उपोषण केले होते. मात्र सदर बियाणे कंपनीने पोलिसांच्या मदतीने हे उपोषणकर्त्यांवर दबाव आणला. त्यावेळी तुपकरांनी मध्यस्थी केली असता दोन दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. जिल्हातील इतर भागातील शेतकऱ्यांचेही बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी आणि पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करुन द्यावे,अशी मागणी रविकांत तुपकरांनी लाऊन धरली. बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी कृषी अधिक्षक नाईक यांच्याकडे केली. यावेळी ग्रीनगोल्ड कंपनीचे एमडी तथा मालक मुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी या संदर्भात योग्य निर्णय देण्याची भूमिका न घेतल्याने रविकांत तुपकर आक्रमक झाले आणि त्यांनी सदर कंपनीचे गोडावून व कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. कृषी अधीक्षक कार्यालयाची देखील तोडफोड करु मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आता उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. शहर पोलिसांनी तातडीने येथे पोहचून बंदोबस्त तैनात केला. दुपारी एक वाजेपासून सायंकाळी पाच वाजेनंतरही हे आंदोलन सुरुच होते. कंपनी शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे देऊ म्हणते मात्र ते बियाणे कधी मिळणार, तोवर पेरणीची वेळ निघुन जाईल शिवाय ते बियाणे देखील उगवले नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचे. त्यांच्या हातातून संपूर्ण हंगाम निघून जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना रोखीने नुकसान भरपाई द्यावी, त्या शिवाय कार्यालयातून उठणार नाही या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम होते, त्यामुळे उशीरापर्यंत तणावपूर्ण परिस्थितीत हे आंदोलन सुरुच होते.

यावेळी 'स्वाभिमानी'चे राणा चंदन, नितीन राजपूत, पवन देशमुख, शेख रफिक शेख करीम, सैय्यद वसीम, प्रदिप शेळके यांच्यासह शेतकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...