आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रंथोत्सवात वाचकांना दुर्मिळ ग्रंथांची मेजवानी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोेबाइल, इंटरनेट, फेसबुकच्या जगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. नवीन पिढीत वाचकांची संख्या कमी होत चालली आहे, मात्र ग्रंथोत्सवात प्रकाशकांकडून दुर्मिळ ग्रंथाची मेजवानी वाचकांना देण्यात आली होती. काही जण महापुरुषांच्या समग्र चरित्रांचा खजिना शोधताना बघायला मिळतात. त्यांचा शोध ग्रंथोत्सवात पूर्ण झाल्याचे दिसले.

विभागीय ग्रंथोत्सवानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात रसिकांची संख्या तुरळक दिसून आली. मात्र काही वाचक अनेक स्टॉलवर दुर्मिळ ग्रंथाचाही शोध घेताना दिसले. आजच्या आधुनिकतेच्या काळात अॅमेझॉनसह इतर वेबसाइटवर ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र काही दुर्मिळ ग्रंथ अजूनही या साइटवर उपलब्ध नसल्याने वाचकांना ग्रंथोत्सव ही चांगली संधी होती.

भारतीय संविधान भेट : रजत प्रकाशनचे अशोक कुमठेकर यांनी सांगितले की, ललित साहित्याचा आगळावेगळा खजिना उपलब्ध आहे. जनार्दन वाघमारे यांचे “वाटा विचारांच्या’, सुनंदा जमदग्नी यांचे “यशश्री’, प्रा. विश्वास वसेकर यांचे “मराठवाड्याचे साहित्य’, प्रा. द. रा. कुलकर्णी यांचे “ऋनानुंबध’ अशी अनेक दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. सार्वजनिक ग्रंथालयाने खरेदी केलेल्या पुस्तकांवर भारतीय संविधानसुद्धा भेट देण्याची सुविधा दिली होती.

तुकारामांचे चरित्र, कौटिल्याचे अर्थशास्त्रही उपलब्ध
राजहंस प्रकाशनचे विक्रेते विजय जैन यांनी सांगितले की, विनया खडपेकर यांचे ‘अहिल्याबाई होळकर’, अरुण साधू यांचे ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’, कविता महाजन यांचे ‘भिन्न..’, ‘योद्धा संन्यासी’ अशा ग्रंथांची मेजवानी रसिकांसाठी उपलब्ध करून दिली. कैलास पब्लिकेशनचे डॉ. विजया कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज धर्मतत्त्व मीमांसा’ तसेच शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार बुक डेपोे यांच्यामार्फत ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’, अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय, छत्रपती शाहू महाराज गौरवग्रंथ, तुकारामांचे चरित्र, दलित कवितांचे अर्धशतक, समग्र नामदेव ढसाळ, कौटिल्याचे अर्थशास्त्र अशा विविध प्रकारचे ग्रंथ वाचक रसिकांसाठी ठेवले असल्याचे अशोक राजूरकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...