आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिकांचे उत्पादन:‘ला निना’चा परिणाम; मका, सोयाबीनला सोन्याचे दिवस, महाराष्ट्रासह देशात सोयाबीनला विक्रमी दर

औरंगाबाद / अजय कुलकर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझील, अर्जेंटिनात कमी पावसाने सोयाबीन, मका उत्पादनावर परिणाम

सोयाबीन आणि मका उत्पादनात जगात अव्वल असलेल्या ब्राझील, अर्जेंटिनामध्ये ‘ला निना’मुळे म्हणावा तसा पाऊस न झाल्याने या दोन्ही पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. भारतातही ‘ला निना’मुळे झालेल्या अतिवृष्टीचा फटका सोयाबीनला बसला आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त यामुळे सोयाबीनने गेल्या सहा वर्षांतील किमतीचा विक्रम मोडला आहे. शेतकऱ्यांनी एकाच वेळी विक्री न करता, वाढत्या किमतीला एक लाॅट अशी विक्री करावी, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘ला निना’मुळे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते. परिणामी दक्षिण अमेरिका खंडात पावसात अडथळा निर्माण होतो. यामुळे ब्राझील,अर्जेंटिनामध्ये कमी पाऊस, पावसात मोठे खंड याचे प्रमाण जास्त राहील. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा तेथील सोयाबीन आणि मका पिकाचा मुख्य हंगाम असतो. सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक असून अर्जेंटिना तिसऱ्या स्थानी आहे. यंदा तेथे मका आणि सोयाबीनची पेरणी उशिरा सुरू झाली. ब्यूनस आयर्स ग्रेन एक्स्चेंज बोर्डनुसार डिसेंबरअखेर अर्जेंटिनात मक्याचा पेरा ३२ टक्के झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत तो सहा टक्क्यांनी कमी होता. ब्राझीलच्या पराना भागात मक्याचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घटण्याची शक्यता ब्राझीलच्या कृषी विभागाने वर्तवली आहे. भारतात ‘ला निना’मुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीनचा उतारा घटला. मागणी जास्त असल्याने सोयाबीनला प्रतिक्विंटल ४२०० ते ४८०० रुपये भाव मिळतो आहे. सोयाबीनची आधारभूत किंमत ३८५० तर मक्याची एमएसपी १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. एक ते सहा जानेवारी या काळात पुणे बाजारपेठेत मका १४०० ते २२०० रुपयांप्रमाणे खरेदी झाला.

सोयाबीन तेजीत राहणार
ब्राझील, अर्जेंटिनामध्ये ला निनामुळे मका, सोयाबीनच्या ऐन वाढीच्या काळात पावसात खंड पडत आहे. पेरणी उशिरा झाल्याने काढणीही फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. मका आणि सोयाबीनमध्ये तेजी राहील. -डॉ. रामचंद्र साबळे, सदस्य, साऊथ-ईस्ट एशिया अॅग्रो क्लायमेटिक फोरम.

एकाच वेळी विक्री नको
शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवल्यास ही बेस्ट पिक्स ठरू शकते. सरकारने आयात शुल्क घटवल्यास दर घसरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन, मका एकदम न विक्री करता, प्रत्येक वाढत्या किमतीला एक लॉट याप्रमाणे विक्री करावी व नफा पदरात घ्यावा. -विश्वनाथ बोदडे, कमोडिटी व्यवहार तज्ज्ञ, नाशिक

बातम्या आणखी आहेत...