आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अपात्र ठरलेल्या एकूण १२ हजार ८५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर १० कोटी २ लाख ६ हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम वसूल करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत एक कोटी ८५ लाख ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले. आणखी ८ कोटी १६ लाख ३० हजार रुपये वसूल करणे बाकी आहे. यात योजनेचा लाभ घेणारे ६ हजार ४९९ शेतकरी आयकर भरणारे असल्याची माहिती आहे.
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रतिहप्ता दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले होते. निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शासकीय-निमशासकीय नोकरदार, आयकर भरणारे, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त यासह डॉक्टर, वकील, अभियंता, आजी, माजी लोकप्रतिनिधी, एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती यात पती-पत्नी यांनीही योजनेतून अर्ज भरला होता. परंतु, दहा हजार रुपये निवृत्तिवेतन घेणारे या योजनेसाठी अपात्र ठरतात. दरम्यान, हे सर्व अपात्र ठरले असून आयकर भरणाऱ्यांची यादी केंद्र सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली होती.
यात नांदेड जिल्ह्यातील ६ हजार ४९९ शेतकरी आयकर भरणारे असून त्यांच्या खात्यावर ६ कोटी ७ लाख २६ हजार रुपये जमा करण्यात आले होते. तसेच दोन जिल्ह्यांत मालमत्ता असणारे व एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांचा समावेश असणाऱ्या ६ हजार ३५७ लाभार्थींचा समावेश आहे. त्यांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८० हजार रुपये जमा झाले. हे सर्व अपात्र ठरले आहेत. यात आतापर्यंत २ हजार १७ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८५ लाख ७६ हजार रुपये वसूल झाले आहेत.
किनवटला एकही वसुली नाही
या योजनेतंर्गत आतापर्यंत १ कोटी ६० लाख ४८ हजार रुपये आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून तर २५ लाख २८ हजार इतर अपात्र शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत. यात इतर अपात्रमध्ये किनवट तालुक्यातून ३३६ शेतकऱ्यांपैकी अद्याप एकाही शेतकऱ्याकडून वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. तर माहूरमधून केवळ एकाच शेतकऱ्याकडून वसुलीला यश मिळाले आहे. तसेच मुखेड तालुक्यातील आयकर भरणाऱ्या ६९१ शेतकऱ्यांपैकी २६६ शेतकऱ्यांनी २४ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.