आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष‎:परभणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी‎ 'स्पेशल एमपीएससी' द्वारे भरतीचा पर्याय‎

प्रवीण ब्रह्मपूरकर | छत्रपती संभाजीनगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या‎ प्रस्तावात त्रुटी काढल्याच्या विरोधात परभणीत सोमवारी‎ (८ मे) मोठे आंदोलन केले जाणार आहे.‎ मराठवाड्यातील महाविद्यालयासमोर मान्यतेचे संकट‎ उभे राहिले आहे. राज्यात नंदुरबार, अलिबाग, सातारा‎ आणि सिंधुदुर्ग या शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयांसाठी ‘स्पेशल एमपीएससी’च्या‎ माध्यमातून डॉक्टरांच्या माध्यमातून भरती करण्यात‎ आली होती. त्यामुळे नंदुरबारचा बदल्यांचा आणि‎ नियुक्तीचा पॅटर्न परभणीसाठी शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयासाठी फायद्याचा आणि मार्गदर्शक ठरणार‎ आहे

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या‎ तपासणीच्या वेळी ‘एनएमसी’ने (नॅशनल मेडिकल‎ कौन्सिल) त्रुटी काढल्यामुळे महाविद्यालयाच्या‎ मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता हा मुद्दा‎ राजकीय देखील बनला आहे. खासदार इम्तियाज‎ जलील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित‎ याचिकेमुळे वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरांच्या‎ प्रतिनियुक्तीची अडचण झाली आहे.‎

कॉलेजच्या प्रस्तावातील त्रुटींबाबत आज परभणीत आंदोलन‎
नंदुरबारच्या त्रुटी तीन‎ महिन्यांत केल्या दूर‎ याबाबत ‘दिव्य मराठी’ने अंबाजोगाई‎ आणि नंदुरबारचे तत्कालीन‎ अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे‎ यांच्याशी वैद्यकीय‎ महाविद्यालयाच्या उभारणीच्या‎ अनुभवाबाबत संवाद साधला‎ असता त्यांनी सांगितले की,‎ नंदुरबारमध्ये २०२० मध्ये रुजू‎ झाल्यानंतर आमच्या वैद्यकीय‎ महाविद्यालयाबाबत १०० टक्के‎ काढलेल्या त्रुटी आम्ही तीन‎ महिन्यांत दूर केल्या. आम्ही छत्रपती‎ संभाजीनगर, धुळे येथून‎ प्रतिनियुक्तीने डॉक्टर बोलावले होते.‎ तीन महिन्यांत व्याख्यान कक्ष,‎ प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारले होते.‎ ग्रंथालयासाठी दीड हजार पुस्तके‎ ‘डीपीसी’च्या निधीतून घेतली होती.‎

इच्छुकांच्या बदल्या करणे‎ कॉलेजसाठी लाभदायक‎
लातूर, नांदेड, अंबाजोगाई,‎ छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर‎ ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय‎ आहेत. त्यामुळे बदलीसाठी इच्छुक‎ असलेल्यांच्या तेथून बदल्या केल्यास‎ फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर‎ ‘स्पेशल एमपीएससी’च्या‎ माध्यमातून भरतीमुळे रिक्त जागांचा‎ प्रश्न सुटेल.‎ ‎ - डॉ. शिवाजी सुक्रे, माजी‎ अधिष्ठाता, नंदुरबार शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय‎

परभणीच्या कॉलेजसाठी‎ जागा लवकर भरणार‎
परभणीसाठी शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयासाठी प्राध्यापकांच्या‎ रिक्त जागांचा प्रश्न लवकरच‎ सोडवला जाईल. ‘एमपीएससी’च्या‎ माध्यमातून जागा भरल्या जाणार‎ आहेत. त्यासाठी वेळ लागणार‎ असला, तरी येत्या दोन दिवसांत‎ नियुक्तीसाठी वैद्यकीय‎ संचालनालयाच्या माध्यमातून‎ बदल्या केल्या जाणार आहेत.‎ ‎ - डॉ. दिलीप म्हैसेकर,‎ वैद्यकीय संचालक, वैद्यकीय शिक्षण‎

वैद्यकीय शिक्षण भरतीचा नंदुरबार पॅटर्न राबवून मान्यतेचा प्रश्न सोडवणे शक्य‎
कालबद्ध पदोन्नती, विनंती बदल्या कराव्यात‎ वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून प्राध्यापक काम करतात. त्यांना‎ पदोन्नती दिली जात नाही. त्यामुळे कालबद्ध पदोन्नती मिळाली, तर रिक्त‎ जागांचा प्रश्न सुटू शकेल. त्याचबरोबर विनंती बदलीच्या माध्यमातून देखील‎ इच्छुकांची बदली केल्यास प्राध्यापकांच्या रिक्त जागेचा प्रश्न सुटू शकतो.‎