आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करांचा भार ग्राहकांवर:तांबे-पितळाच्या वस्तूंवरील वाढीव जीएसटी कमी करा ; भांडी बाजार असोसिएशनची मागणी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपंचमीपासून विविध सणांची सुरुवात झाली आहे. आता दिवाळीपर्यंत अनेक सणवार आहेत. त्यामुळे तांबे-पितळाच्या विविध प्रकारच्या भांड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी वाढली आहे. लग्नकार्याच्या दिवसातही खरेदी वाढत जाईल. मात्र या वस्तूंवर १२ ते १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी कर लावलेला आहे. त्याचा भार ग्राहकांवर पडत आहे. यंदा तर २० ते २५ टक्के भाव वाढले आहेत. सरकारने जर कर कमी केले तर ग्राहकांना कमी दरात या वस्तू मिळू शकतील, भांडी बाजार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पातूरकर यांनी सांगितले.

गुलमंडी भागातील भांडी बाजार जुनी बाजारपेठ आहे. याठिकाणी मुंबई, पुणे, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, मथुरा, मुरादाबाद, अलिगड, रेवाडी आदी भागांतून माल आणला जातो. यामध्ये प्रेशर कुकर सर्वाधिक दिल्लीतून, अलिगडला मूर्ती, तांब्याचे जग, टाक्या मथुरा या भागात उत्पादन केले जाते. सध्या समई, फॅन्सी भांडी, ताट, पूजेसाठी लागणारे ताट, महालक्ष्मी खरेदी वाढली आहे. परंतु करामुळे तांबे- पितळाच्या वस्तूंचे २० ते २५ टक्क्यांनी भाव वाढले आहेत, असे राजहंस भांडी बाजारचे चंपत गणेशमल जैन यांनी सांगितले.

भांड्यावर १२ टक्के, तर मिक्सरवर १८ %जीएसटी
तांबे-पितळाच्या धातूवर शासनाने १२ टक्के तर स्टीलचे चमचे, मिक्सर यावर १८ टक्के जीएसटी कर लागू केला आहे. याचा भार सामान्यांवर पडत आहे. हा कर कमी करावा.
- नितीन पातूरकर, अध्यक्ष, भांडी बाजार असोसिएशन.

बातम्या आणखी आहेत...