आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले आहे. याबाबत २७ मार्चपर्यंत दावे आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. या हरकतीनंतर आलेल्या दाव्याचा अहवाल राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. ‘औरंगाबाद’चे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया काय असेल, याची उत्सुकता छत्रपती संभाजीनगरकरांना आहे. ‘एमआयएम’ने या नामांतराला विरोध केला आहे. ज्यांचा विरोध आहे ते दावे हरकती दाखल करू शकतात. शहराचे नाव बदलले तरी केंद्रीय कार्यालयांचे नाव अजून बदललेले नाहीत. बँकांच्या शाखांची नावे अजून बदलली नाहीत. याबाबतची नेमकी प्रक्रिया काय आहे याबाबत ‘दिव्य मराठी’ने माजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याशी संवाद साधला असता महिनाभर दावे-हरकतीची प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्याचा अहवाल पाठवला जाईल. शासनाकडून त्या अहवालाबाबत निर्णय घेतला जाईल. अनेकदा नामांतर झाल्यानंतर असे अहवाल फेटाळल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यानंतर या अहवालानंतर पुन्हा सरकारकडून सर्व कार्यालयांना नाव बदलाबाबत सूचना देण्यात येतील. त्यामुळे साधारण तीन महिन्यांत सर्व केंद्रीय कार्यालये, राज्य सरकारी कार्यालयांवरील नावे बदलली जाऊ शकतात. अनेक फॉर्म, शासकीय नोंदीवरदेखील त्यानंतर हे नाव वापरले जाईल, असे त्यांनी सांगितले. शहराचे नाव बदल करण्यास एमआयएम पक्षाचे खासदार इम्प्तियाज जलील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहराच्या नामांतराच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.