आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर कॉलनीवर बुलडोझर:बेघर रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे, जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन कक्ष

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लेबर काॅलनीत बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत माहिती दिली.

काल लेबर कॉलनीतील 338 घरे 30 जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे शेकडे कुटुंबे रस्त्यावर आली. या रहिवाशांसाठी जिल्हा प्रशासनाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे बेघर झालेल्या रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन कक्ष सुरु करण्यात आला आहे. बेघर नागरिकांनी या कक्षाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षासाठी अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. लेबर कॉलनीतील कारवाईमुळे जे नागरिक बेघर झाले, ज्यांच्याकडे दुसरे कोणतेही घर नाही, अशा पात्र नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्यात येतील. अशा नागरिकांनी आधार कार्डसह पुनर्वसन कक्षाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

घरांसाठी अडीच लाखांची सबसिडी
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र रहिवाशांना अडीच लाखांची सबसिडी देण्यात येईल. इतर पैसे त्यांना बँकेकडून लोन घेऊन किंवा इतर माध्यमांनी उभे करावे लागतील. यासाठी जिल्हा प्रशासन रहिवाशांना पूर्ण सहकार्य करेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

...म्हणून कारवाई करणे आवश्यक होते
लेबर कॉलनीतील इमारती जीर्ण झाल्या होत्या. औरंगाबाद अभियांत्रिकी महाविद्यालयाने तसा अहवाल दिला आहे. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही तातडीने या घरांवर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच, सेवाकाळ समाप्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेली घरे परत करणे आवश्यक होते. मात्र, कर्मचारी ही बाब विसरले. त्यामुळे कारवाई करावी लागली, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...