आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली येथील सुराणा नगरातील दरोडा प्रकरणात हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने ११ दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्या कडून १०.४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक दुचाकी व एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या दरोडेखोरांनी ४ मार्च रोजी घराची रेकी करून ७ मार्च रोजी दरोडा टाकल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
हिंगोली शहरालगत सुराणा नगरात राज्य राखीव दलाचे जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घरावर ११ ते १२ दरोडेखोरांना रविवारी (ता. ७) पहाटे दरोडा टाकला. यामध्ये सुमारे २.२५ लाख रुपयांचा ऐवज पळविला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी तपास पथके स्थापन केली. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांना दरोडेखोरांचा माग काढता आला. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, राहूल तायडे, जमादार बालाजी बोके, भगवान आडे, संभाजी लकुळे, अशोक धामणे, जयप्रकाश झाडे, गजानन पोकळे, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने गुरुवारी ता. ११ पहाटे सात जणांना तर आज पहाटे उर्वरीत ४ जण अशा ११ दरोडेखोरांना अटक केली आहे. हे सर्व जण जालना जिल्हयातील आहेत. त्यांच्या अधिक चौकशीत त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी, एक चारचाकी वाहन तसेच सोन्या चांदीचे दागिने, तीन एलईडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर कत्ती, चाकू, बॅटऱ्या, दोरी यासह इतर हत्यारे जप्त केली आहेत.
दरम्यान, या दोरोडेखोरांपैकी दोघांनी ४ मार्च रोजी हिंगोलीत येऊन त्या घराची रेकी केली होती. घराकडे येण्यासाठी कोणता रस्ता सोपा आहे, घराला लागूनच किती घरे आहेत, पळून जाण्यासाठी जवळचा कोणता रस्ता आहे हि सर्व माहिती घेतली होती. त्यानंतर ७ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता ११ दरोडेखोरांनी येऊन दरोडा टाकला अन वाहनाने पळून गेल्याचे त्यांच्या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना समावेश असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
मराठवाड्यातील दरोड्याची प्रकरणे उघडकीस येणार
मराठवाड्यात यापुर्वी घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात या दरोडेखोरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यानुसार माहिती घेण्यास सुरवात केली असून अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.