आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीसीटीव्ही नसल्याचा गैरफायदा:स्टोअरमधूनच रेमडेसिविरवर डल्ला; पाच जणांना नोटिसा, पण गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य मराठी’ने प्रकरण उघडकीस अाणल्यानंतर अधिकाऱ्यांचीही कबुली

महापालिकेच्या भांडारगृहात (स्टोअर) सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे तेथील सर्व व्यवहार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विश्वासावर चालतो. हीच बाब हेरून मनपा कर्मचाऱ्यांनी मेल्ट्रॉन कोविड सेंटरसाठीचा रेमडेसिविर इंजेक्शनचा एक बॉक्स उचलला. त्यातील ४८ इंजेक्शन काढले आणि त्याऐवजी एमपीएस नावाचे इंजेक्शन टाकले, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पाच जणांवर संशयाची सुई आहे. मात्र, घटना निदर्शनास येऊन सहा दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. फक्त भांडार विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, मुख्य फार्मासिस्ट बी. डी. रगडे, सहायक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे, दीपाली साने व अनंत देवगिरीकर यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

हे खळबळजनक प्रकरण सर्वप्रथम “दिव्य मराठी’नेच २८ एप्रिल रोजी उघडकीस आणले. तत्पूर्वी सुरू झालेल्या चौकशीत असे समोर आले की, मनपाने मेल्ट्रॉनसाठी खरेदी केलेल्या दहा हजार रेमडेसिविरपैकी शेवटचे तीन बॉक्स २१ एप्रिल रोजी भांडारगृहात शिल्लक राहिले होते. २२ एप्रिल रोजी यापैकी एका बॉक्समधील इंजेक्शन शिताफीने काढून घेत त्यात दुसरे इंजेक्शन टाकण्यात आले आणि त्यासह तीन बॉक्स मेल्ट्रॉनला पोहोचवण्यात आले.

मनपा अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी बुधवारी तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जयभवानीनगरातील मनपा वॉर्ड कार्यालयाच्या बाजूला असलेल्या इमारतीत दोन महिन्यांपूर्वी भांडारगृह (स्टोअर) तयार केले आहे. तेथे इंजेक्शनचा साठा होता. यातील २६ बॉक्स २० एप्रिल रोजी मेल्ट्रॉनला देण्यात आले. तीन शिल्लक राहिले. ते २२ एप्रिलला मेल्ट्रॉनला पोहोचवण्यात आले. यातील एका बॉक्समध्ये रेमडेसिविरऐवजी ४० ते ५० रुपयांत मिळणारे एमपीएस नावाचे इंजेक्शन असल्याचे मेल्ट्रॉन येथील फार्मासिस्टच्या दुसऱ्या दिवशी निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ येथील नोडल अधिकारी डॉ. वैशाली मुदगडकर यांना माहिती दिली. त्यांनी ती वरिष्ठांना दिल्यावर भांडारगृह प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी प्राथमिक चौकशी केली. तेव्हा हा गंभीर प्रकार समोर आला.

… म्हणून तेथे उघड झाले
जयभवानीनगरातील मनपाच्या भांडारगृहात सीसीटीव्ही नसले तरी मेल्ट्रॉन कोविड सेंटरला आहेत. तेथे प्रत्येक इंजेक्शनच्या वापराची नोंदणी केली जाते. शिवाय रेमडेसिविरचे बॉक्स सीसीटीव्हीसमोर खुले करावेत, असेही बंधन आहे. त्यामुळे हा प्रकार उघड झाला.

बातमी अाल्यानंतर दिल्या नाेटिसा
मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दाेषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश २३ एप्रिल रोजी दिले होते. पण अधिकाऱ्यांनी आधी नोटिसा, मग कारवाई असा पवित्रा घेतला. तो पांडेय यांनी मान्य केला. प्रत्यक्षात प्रशासकांची सहीच झाली नसल्याने नोटिसा देणेही थांबले हाेते. मात्र दिव्य मराठीत बातमी अाल्यानंतर बुधवारी नाेटिसा देण्यात अाल्या.

मायलॉन कंपनीकडेही चौकशी
रेमडेसिविरचे बॉक्स मायलॉन कंपनीतून जेट विमानाने शहरात आले होते. त्यामुळे कंपनीकडून चुकून एमपीएस इंजेक्शनचा बॉक्स आला का, अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा आम्ही एमपीएस इंजेक्शनच तयार करत नसल्याचे उत्तर मिळाले. मात्र, मनपाने तक्रार केल्यास आमच्या स्तरावर चौकशी करू, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

दोषींवर गुन्हा दाखल होईल
भांडारगृहातून इंजेक्शन गायब झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा घेणार आहोत. त्यानंतर दोषींवर गुन्हा दाखल होईल. -आस्तिककुमार पांडेय, मनपा प्रशासक

कोट्यवधींची उलाढाल, पण...
नवीन इमारत मिळाली म्हणून मनपाने दोन महिन्यांपूर्वी भांडारगृह मुख्यालयातून जयभवानीनगरात हलवले. येथे दरमहा कोट्यवधींच्या औषधींची उलाढाल होते. तरीही सीसीटीव्ही लावलेले नाहीत. कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर व्यवहार सुरू होता. त्याचाच गैरफायदा घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...