आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूनंतरही हालअपेष्टा:रुग्णवाहिका न आल्याने पीपीई किट घालून नातलगांनी केले अंत्यसंस्कार, कोविड योद्ध्या गुरुजींच्या मृत्यूनंतर हालअपेष्टा

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षक दिगंबर शेळके यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिकेसह आरोग्य कर्मचारी उपलब्ध न झाल्याने नातेवाइकांनीच पीपीई किट परिधान करून शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. - Divya Marathi
शिक्षक दिगंबर शेळके यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिकेसह आरोग्य कर्मचारी उपलब्ध न झाल्याने नातेवाइकांनीच पीपीई किट परिधान करून शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
  • पाच तास रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा करूनही रुग्णालयाला पाझर फुटला नाही

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात कोविड योद्धे दिगंबर शेळके या शिक्षकाचा मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकाच मिळाली नाही. तसेच रुग्णालयाने सोबत कर्मचारीही दिले नाहीत. १०८ या क्रमांकावर संपर्क साधूनही मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पाच तास प्रतीक्षेनंतरही रुग्णवाहिका आली नसल्याने अखेर संतप्त नातेवाइकांनीच पीपीई किट घालून खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील रहिवासी असलेले दिगंबर लक्ष्मण शेळके (५२) हे नर्सी नामदेव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. त्यांच्याकडे शालेय पोषण आहार वाटपासह प्रवेश निर्गम उतारा देणे, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देणे आदी कामे देण्यात आली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते शाळेत येत होते. या शिवाय गावात ही ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत होेते. मात्र मागील पाच दिवसांपूर्वी त्यांना सर्दी, ताप, खोकला सुरू झाला. त्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी केली. मात्र रुग्णालयाकडून त्यांना कोणीही दाद दिली नाही. रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नसल्याचे सांगत १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर या क्रमांकावर वारंवार संपर्क केल्यानंतरही संपर्क झालाच नाही. पहाटे अडीच वाजेपर्यंत एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी खासगी रुग्णवाहिका बोलावली. त्या रुग्णवाहिकेच्या चालकास पीपीई किट देण्यात आला. तसेच मयत शेळके यांच्या नातेवाइकांनी पीपीई किट घालून मृतदेह सोबत घेतला. पहाटे तीन वाजता त्यांच्यावर रिसाला पॉवर हाऊस जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल पाच तास रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा करूनही रुग्णालयाला पाझर फुटला नाही. तर १०८ क्रमांकावर अखेरपर्यंत संपर्क झाला नाही. या प्रकारामुळे नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

१०८ रुग्णवाहिकेबाबत तक्रार करणार

नर्सी नामदेव येथील शिक्षक दिगंबर शेळके यांचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका दिलीच नाही. शिवाय १०८ क्रमांकावरही संपर्क झाला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेदहा ते शुक्रवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत रुग्णालयाच्या परिसरात ताटकळत बसावे लागले. या प्रकरणी आपण पालकमंत्री वर्षा गायकवाड, खासदार ॲड. राजीव सातव यांच्याकडे तक्रार करणार आहे. -डॉ. सतीश पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य

पालिकेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह

राज्यात इतर जिल्ह्यांत कोविड रुग्णाच्या मृत्यूनंतर पालिकेच्या पथकाकडून पीपीई किट घालून योग्य काळजी घेत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र हिंगोली पालिकेला हे का जमत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...