आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अकरावीच्या प्रवेशासाठी कागदपत्र सादरीकरणाला शिथीलता

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 115 महाविद्यालयात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शनिवारी पासून सुरुवात झाली. विशेष म्हणजे यंदा गुणपत्रिकेद्वारे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जावून मिळालेला लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरुन अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिका क्षेत्रांमध्ये होणाऱ्या अकरावीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीच्‍या प्रवेश प्रक्रियेत दहावीची गुणपत्रिका व हमीपत्राच्‍या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. कागदपत्रे सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्‍यांची मुदत दिली जाणार आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकात म्‍हटले आहे, की अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना दहावीचे ऑनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळा सोडल्‍याचा व जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्‍याचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे उपलब्‍ध असल्यास ऑनलाईन अपलोड करावीत. मात्र, सक्तीने ही कागदपत्रे अपलोड करणे विद्यार्थ्यांना सध्या बंधनकारकर करण्यात येवू नये, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यासह क्रीडा प्रावीण्य, दिव्‍यां, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्‍पग्रस्त असे विविध प्रमाणपत्र अशा समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना अपलोड करायची आहेत. तांत्रिक कारणामुळे ही कागदपत्रे सादर करणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांनी हमीपत्र भरुन घ्यावे. तसेच ही प्रमाणपत्र सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्‍या माहितीच्‍या आधारे प्रवेश दिला जात असून, सत्‍यतेबाबतची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असणार आहे. असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

अर्ज नोंदणीचा भाग एक भरण्यास सुरुवात

शहरातील 115 महाविद्यालयात 26 जुलैपासून अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत 11 हजार 144 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. या प्रक्रियेतील पहिल्‍या टप्प्‍यात शनिवारी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 84 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला असून त्यातून 39 अर्जांचे प्रमाणिकरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...