आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध फसवेगिरीविरुद्ध:रेमडेसिविरचा काळाबाजार थांबणार; जिल्हाधिकारी करणार वितरण, गरजू रुग्णांनाच मिळेल इंजेक्शन

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारी रेमडेसिविर चढ्या भावाने विकणाऱ्या तिघांना औरंगाबादेत अटक 15 हजारांत विक्री; बीड कनेक्शन उघड

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा झाला आहे. दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार आता रुग्णांच्या जिवावर उठला आहे. तो थांबवण्यासाठी रामबाण म्हणून आता प्रशासन सज्ज झाले असून हे इंजेक्शन आता फक्त रुग्णालयांनाच देण्यात येणार आहे. औषध दुकानांत रेमडेसिविरच्या विक्रीस बंदी घालण्यात आली असून हा काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांवर या इंजेक्शनच्या वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थातच गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन माफक दरात दिले जावे, हा यामागील उद्देश आहे.

सरकारी रेमडेसिविर चढ्या भावाने विकणाऱ्या तिघांना औरंगाबादेत अटक 15 हजारांत विक्री
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या बातम्या राज्यभरातून येत आहेत. असा काळाबाजार करणाऱ्या तिघांना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर पाेलिसांनी शुक्रवारी अटक केली.जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी अनिल ओमप्रकाश बाेहते हा रुग्णालयात असलेल्या साठ्यातून इंजेक्शन मिळवून शिवाजीनगर भागातील मेडिकल चालक मंदार अनंत भालेराव व सुतगिरणी चौकातील मेडिकल चालक अभिजित नामदेव तौर यांना तब्बल ९ हजार रुपयांत विकत हाेता. हे मेडिकल दुकानदार त्यावर आणखी पैसा कमावण्यासाठी ग्राहकांना या इंजेक्शनची तब्बल १५ हजार रुपयांत विक्री करत होते.

गुरुवारी पोलिसांनी भालेराव याच्याकडे डमी ग्राहक पाठवून त्याला रेमडेसिविरची अवैध विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर इंजेक्शनच्या काळ्या बाजारातील हे रॅकेट उघडकीस अाले. पोलिसांनी जप्त केलेल्या तीन इंजेक्शनपैकी दोन जिल्हा रुग्णालयातील तर एक बीड येथील एका व्यावसायिकाकडून आणल्याचे चौकशीत समोर आले आहे. बाेहतेने दाेन इंजेक्शन सहा दिवसांपूर्वी चाेरले हाेते. तर एक बीडच्या व्यावसायिकाडून विकत घेतल्याचे भालेरावने सांगितले.

असा थांबेल इंजेक्शनचा काळाबाजार - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

  • जे रुग्ण अति गंभीर असतील त्यांना प्राधान्यक्रमाने आधी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येणार आहे.
  • यासाठी रुग्णालये रुग्णांची माहिती सकाळी नऊपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला ईमेलद्वारे कळवतील.
  • रुग्णांच्या माहितीच्या मेलमध्ये रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबर व ई-मेल असणे आवश्यक.
  • गंभीर रुग्णांची यादी मिळाल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिफारशीनुसार उपलब्ध इंजेक्शनचा ठराविक प्रमाणात कोटा मंजूर करण्यात येईल.
  • नंतर रुग्णालयाला वितरक निश्चित करून देण्यात येईल. त्यांच्याकडून संबंधित रुग्णालयाने कोटा उपलब्ध करून घ्यावा.
  • ज्या रुग्णांसाठी वापरले जाणार आहे, त्या रुग्णांची नावे व संबंधित औषधांवर मार्करने वितरकाचे नाव लिहावे.
  • इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या जतन कराव्यात. त्या भरारी पथकाला उपलब्ध करून देणे बंधनकारक.
  • गंभीर रुग्णाची माहिती विहित नमुन्यात भरली नाही आणि त्याला इंजेक्शन मिळाले नाही तर ही जबाबदारी संबंधितांवर.

रेमडेसिविर रुग्णालयांनाच, दुकानदारांना बंदी : शिंगणे
मुंबई | रेमडेसिविर वापराची आचारसंहिता पाळली जात नाही. परिणामी तुटवडा झाला. म्हणून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनाच रेमडेसिविर पुरवण्यात येत असून औषध दुकानांत ते विकता येणार नाहीत. त्यामुळे याचा काळाबाजार संपुष्टात येत असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी केला. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वाटपाचे नियंत्रण करण्याचे आदेश दिले आहेत. चार दिवसांत तुटवडा संपेल, असे सांगून निर्यातसाठा विक्रीस परवानगी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

गुजरातला जमले, महाराष्ट्राला का नाही ? : प्रवीण दरेकर
मुळात रेमडेसिविर मिळवण्याची त्वरेने हालचाल राज्य सरकारने करायला हवी होती. आम्ही भाजप नेते १२ एप्रिल रोजी दमणला गेलो. तेथील ग्रुप फार्मा कंपनीशी चर्चा केली. त्यांनी महाराष्ट्राला रोज २० हजार रेमडेसिविर पुरवठ्याचे वचन दिले. मात्र राज्याने निर्यातसाठा विक्रीस परवानगी देण्याची मागणी केली. तो निर्णय आज झाला. हे सर्व गुजरातने आठवड्यापूर्वी केले. महाराष्ट्राला का जमले नाही, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ही ५० हजार इंजेक्शन प्रदेश भाजप मोफत देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...