आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभर जाणवणार रेमडेसिविरचा तुटवडा:रेमडेसिविरचा कंपनी ते बाजार प्रवास 22 ते 24 दिवसांचा

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिविर तयार करण्यासाठी रसायनापासून पॅकेजींगसाठी 25 प्रकारचा कच्चा माल लागतो

राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान रुग्णसंख्या घटल्याने काही कंपन्यांनी उत्पादन कमी, तर काहींनी बंद केली होती. मार्चमध्ये रुग्ण वाढू लागल्यावर पुन्हा उत्पादनाला सुरुवात केली. मात्र, रेमडेसिविरचा कंपनी ते बाजारात दाखल होण्याचा प्रवास २२ ते २४ दिवसांचा असल्याने आणखी किमान आठवडाभर याचा तुटवडा जाणवणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील काही शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे ही टंचाई जाणवत असल्याचे औरंगाबाद येथील एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीतील वरिष्ठ उपाध्यक्ष अपर्णा रत्नपारखी यांनी सांगितले. अपर्णा म्हणाल्या, डिसेंबरच्या पहिल्या आठवडा ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत रूग्णसंख्या घटत असल्याने रेमडेसिविरची मागणी घटली हाेती. मार्चमध्ये उद्रेक वाढल्यावर अचानक मागणी वाढली. गेल्यावर्षी कोरोना उच्चांकावर असतांना राज्याला दररोज ३०-३५ हजार व्हायल लागत होते. आता ही मागणी ४५-५० हजाराच्या घरात गेली आहे. मात्र, कंपन्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादनास तयार नसल्याने तुटवडा जाणवतोय.

२४ दिवसांची प्रक्रिया
रेमडेसिविर तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया २२ ते २४ दिवसांची आहे. प्रत्यक्ष औषध तयार होण्यास ५ दिवस लागतात. त्यास १४ दिवसांच्या स्टर्लीटी टेस्टसाठी ठेवले जाते. नंतर पॅकींग करून ३ दिवसात ते बाजारात पाेहोचते. कंपन्यांनी मार्चच्या अखेरच्या आठवड्यात उत्पादन वाढवले. नवीन साठा बाजारात दाखल होण्यास २३-२४ एप्रिल उजाडू शकतो. म्हणजे आणखी आठवडाभर तरी टंचाई जाणवणार आहे.

२५ प्रकारचा कच्चा माल
रेमडेसिविर तयार करण्यासाठी रसायनापासून पॅकेजींगसाठी २५ प्रकारचा कच्चा माल लागतो. मागणी घटल्याने कंपन्यांनी कच्च्या मालाचा साठा (इन्वेंटरी) ठेवलेला नव्हता. मार्चनंतर कंपन्यांनी पुरवठादारांकडे मागणी नोंदवली. पण अचानक एवढा माल पुरवतांना त्यांनाही मर्यादा पडत असल्याचे एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिव्य मराठी विशेष

सात कंपन्यांची ३१.६० लाख व्हायल क्षमता

  • देशात मायलॅन, हेट्रो हेल्थकेअर, ज्युबीलीयंट लाईफ सायन्सेस, सीप्ला, डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीज, झायडस कॅडीला,सन फार्मा या कंपन्यांची महिना ३१.६० लाख व्हायल उत्पादन क्षमता.
  • हेट्रो हेल्थकेअरची महिन्याला १०.५ लाख व्हायल उत्पादनाची क्षमता आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मागणी नसल्याने मासिक उत्पादन ५० ते ७५ हजारावर आले होते. मार्चमध्ये तर अवघे ३०-३५ हजार डोस केले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन वाढवले. कंपनी तांत्रीक कारणामुळे १३ ते १५ एप्रिल दरम्यान बंद असल्याने पुरवठा झाला नाही.
  • सिप्लाला रेमडेसिविर पुरवठा करणाऱ्या कमला लाईफ सायन्सेस कंपनीने ३१ डिसेंबर ते १ मार्चपर्यंत उत्पादन पूर्णपणे बंद ठेवले होते. अौषधाची एक्सापायरी झाल्याने काही माल फेकून द्यावा लागला. १५ एप्रिलपासून निर्मिती सुरू केली. कंपनीची पूर्वीची क्षमता ६.२ लाख व्हायल होती. आता २ लाख व्हायलपासून सुरूवात केली आहे. १५ दिवसात पूर्ण क्षमतेने काम सुरू होईल.
  • मार्चपूर्वी डॉ.रेड्डीजची महिन्याकाठी ५ लाख, झायडस ५ लाख तर मायलॅनची ४ लाख व्हायलच्या उत्पादनची क्षमता होती. पुढील १५ दिवसात कंपन्या ही क्षमता गाठेल.
बातम्या आणखी आहेत...