आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरस:रेमडेसिविर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅविर कोरोनाविरुद्ध अपयशी; चारही औषधांची कार्यक्षमता तोकडी, डब्ल्यूएचओ सॉलिडेरिटी चाचणीचे निष्कर्ष

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने आता या औषधांवर पैसा वाया न घालवता लवकरात लवकर निर्णय घ्यावा : डॉ. एस.पी. कलंत्री

कोरोनावर हमखास उपाय म्हणून सध्या चर्चेत असलेली रेमडेसिविरहायड्रोक्सीक्लोराक्वीन, लोपिनॅविर, इंटरफेरॉन ही औषधे कोरोनावर तितकी प्रभावी व कार्यक्षम नसल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या चाचणीतून समोर आले आहेत. जगभर कोरोनाच्या रुग्णांना ही औषधे दिली जातात. मात्र या औषधांमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा ना मृत्यूदर घटला, ना त्यांचा रुग्णालयात राहण्याचा काळ कमी झाला. डब्ल्यूएचओच्या सॉलिडेरिटी चाचणीचे हे निष्कर्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटना आता नव्या औषधे, उपचार पद्धतीचा विचार करत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायलमध्ये जगभरातील ३० देशाच्या ४०५ हाॅस्पिटलमधील ११,२६६ रुग्णांचा समावेश होता. या ट्रायल्स २२ मार्च ते ४ ऑक्टोबर या काळात घेण्यात आल्या. यात कोरोनामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांचा मृत्यूदर रेमडिसेविर, हायड्रोक्सीक्लोराक्वीन, लोपिनॅविर, इंटरफेरॉन या रिपर्पज्ड औषधींमुळे घटतो का हे तपासण्यात आले.

त्यात रेमडिसिविरने उपचार होणाऱ्या २७५०, हायड्रोक्सीक्लोराक्वीनने उपचार होणाऱ्या ९५४, लोपिनॅविर-रिटोनॅविर दिलेले १४११ आणि इंटरफेरॉन दिलेल्या २०६३ कोरोना रुग्णांचा अॅक्टिव्ह आर्म ट्रायलमध्ये समावेश होता. तर ही औषधी न दिलेल्या ४०८८ रुग्णांचा कंट्रोल आर्ममध्ये समावेश होता.

सरकारने या औषधांवर तातडीने निर्णय घ्यावा

या अभूतपूर्व पद्धतीच्या चाचणीचे निष्कर्ष दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. तरी सरकारने आता या औषधांवर पैसा वाया न घालवता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सेवाग्राम वर्धा येथील अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री यांनी सांगितले. दरम्यान, या वर आता सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तुलना करण्यासाठी दोन विभागांची तयारी

चाचणीचे निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी व तुलना करण्यासाठी हे दोन विभाग करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही गटांतील रुग्णांत काहीच विशेष फरक आढळून आले नाहीत. दोन्ही गटातील रुग्णांचा मृत्यूदर सारखाच राहिला. तसेच दोन्ही गटातील रुग्णांना सारख्याच प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज भासली. तसेच दोन्ही गटातील रुग्णांना सारख्याच प्रमाणात रुग्णालयात राहावे लागले. म्हणजेच, कोरोना विरुद्ध या चारही औषधांची मात्रा फारशी लागू पडली नाही.

बातम्या आणखी आहेत...