आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा आयुक्त:आस्तिककुमार हटाव ! सर्वपक्षीय आमदार, खासदार आक्रमक; अधिकाऱ्यांच्या मनमानीने संकट वाढले

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य मराठी’ने २०६ नागरिकांचे मारेकरी कोण, असा सवाल करत अधिकारी कुठे चुकले ते दाखवून दिले होते

कोरोना संकटावर मात करण्यासाठी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडीत वेळ घालवला. त्यामुळे कोरोनाने प्राण गमावलेल्या २०६ नागरिकांचे मारेकरी कोण, असा सवाल ‘दिव्य मराठी’ने उपस्थित केला. त्याचे तत्काळ पडसाद उमटले. सर्वपक्षीय खासदार, आमदारांनी बुधवारी (२४ जून) तातडीची बैठक घेतली. त्यात ‘दिव्य मराठी’च्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. अधिकाऱ्यांनी लोकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे, असा आरोप बैठकीनंतर खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील यांनी केला. अधिकाऱ्याचे नाव घेणे अामदार, खासदारांनी टाळले असले तरी त्यांचा रोख ‘आस्तिककुमार पांडेय हटाव’ याच दिशेने होता.

५ एप्रिल रोजी औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी गेल्यावर मनपा, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होईल, फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होतील, अशी १५ लाख औरंगाबादकरांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. जाधववाडी, विविध ठिकाणी भाजी मार्केट, मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई, रुग्णांवर उपचार, अंत्यविधीनंतर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करणे, अंत्ययात्रेतील संख्येकडे दुर्लक्ष, रेड झोनमधील वसाहतींमध्ये लोकांना मदत करणे अशा अनेक मुद्द्यांवर पांडेय, चौधरी आणि प्रसाद यांच्यातील मतभेद समोर येत गेले. त्यामुळे कोरोनाने हातपाय पसरले. रुग्णसंख्या चार हजारांपुढे गेली. मालेगावात उद्रेक होताच जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक सुनील कडासने यांनी विशेष मोहीम राबवून फैलाव नियंत्रणात आणला. जे मालेगावात झाले ते औरंगाबादेत का होऊ शकले नाही हे सर्व मुद्दे ‘दिव्य मराठी’ने २४ जूनच्या अंकात प्रकाशित केले हाेते.

कोरोना रोखण्यासाठी तीन सक्षम आयएएस अधिकारी द्या : जैस्वालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार जैस्वाल यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आयएएस दर्जाचे तीन सक्षम अधिकारी नियुक्त करा, असे म्हणत त्यांनी मनपा प्रशासक पांडेय यांच्याकडील सूत्रे काढून घ्या, असेच सुचवले आहे. पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की,

  1. तज्ञ डॉक्टरांची उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. समितीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करावे.
  2. औषध सामग्री, वैद्यकीय साधनांचा आढावा घ्यावा.
  3. ग्रामीण भागात फैलाव वाढत आहे. तेथे प्रशासन, काही उद्योजक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
  4. डॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन करून रुग्णांच्या संपर्क साखळीतील अधिकाधिक लोक शोधावेत. त्यांच्या स्वॅबची तपासणी करावी.
  5. वारंवार सूचना देऊनही बाधितांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन केले जात नाही. संबंधितांना सूचना देऊन अधिकारी, कर्मचारी आदी मनुष्यबळ वाढवून द्यावे.
  6. खासगी रुग्णालयांच्या सहभागासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा.
  7. महापालिकेला आणखी आर्थिक मदत करावी.

उगमावर घाव आवश्यक
आजार म्हटले की रुग्ण वाढत राहणार. त्यामुळे केवळ रुग्णसंख्या गोळा करून त्यावर इलाज करणे महत्त्वाचे नाही. तर नेमके कुठे चुकते आहे. चुकीचा उगम कुठून झालाय ते शोधून त्यावर घाव घालणे आवश्यक आहे. मी यापूर्वीच सांगितले होते की, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मिळून काम केले तरच या संकटावर नियंत्रण मिळवता येईल. उशिरा का होईना तरुण लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन. - कृष्णा भोगे, निवृत्त विभागीय आयुक्त

आज पालकमंत्र्यांना भेटणार, विभागीय आयुक्तांकडे बैठक

आमदार अंबादास दानवे : शासनाने सर्व सुविधा देऊनही अधिकाऱ्यांनी धरसोडीचे धोरण ठेवले. वेळो‌वेळी समोर येणाऱ्या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत.

आमदार सतीश चव्हाण : घाटी लॅबमध्ये ८०० पेक्षा जास्त स्वॅब तपासणी झाली पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा आवश्यक आहे.

आमदार अतुल सावे : प्रशासनावर सरकार, मंत्र्यांचा वचक नसल्यानेच स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. मंत्रिमहोदयांनीही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. तीन महिन्यांत एकच बैठक घेतली.
अाराेपांबद्दल बाजू जाणून घेण्यासाठी अनेक काॅल केले, मेसेज पाठवले, मात्र पांडेय यांचे उत्तर अाले नाही.

खासदार इम्तियाज जलील: एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आणि वाढत चाललेले बळी हे प्रशासनाचे अपयश आले. या साऱ्या प्रकाराला कोण जबाबदार हे जनतेला कळाले पाहिजे.

खासदार डॉ. भागवत कराड : अतिशय चिंताजनक वातावरण आहे. प्रशासन कुठे आहे, असा प्रश्न पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसलाच नाही.

आमदार संजय शिरसाट : लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाला काम करता आले नाही, असे अनेक वेळा म्हटले जाते. इथे तर लोकप्रतिनिधी तर कोसो दूर होते.

सुभेदारीवर सर्वपक्षीय एकत्र
‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड यांनी २४ जून रोजी सुभेदारी विश्रामगृहावर तासभर बैठक घेतली. त्यास शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, भाजपचे अतुल सावे आणि राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण उपस्थित होते.

सुभाष देसाई, सुनील केंद्रेकर यांच्याकडेही मुद्दे मांडणार

इम्तियाज, डॉ. कराड यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आता काय करता येईल याविषयी २५ जून रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे बैठक होईल. त्या बैठकीत आम्ही विविध मुद्दे मांडू. याशिवाय २५ रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांचीही दुपारी भेट घेऊन उपाययाेजनेसंदर्भात चर्चा करू.

बातम्या आणखी आहेत...