आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुचर्चित ऑरिक सिटीमध्ये उद्योगांना पायाभूत सुविधा वेगाने उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेवसिंग तसेच ऑरिकचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी पाहणी करुन आढावा घेतला. प्रलंबित असलेल्या समृद्धी इंटरचेंजसाठी भूमिअधिग्रहण तात्काळ करावे, अशा सुचना बलदेवसिंग यांनी दिल्या. तर ऑरिकमध्ये असलेल्या विविध पायाभूत सुविधांची पाहणी आणि अपेक्षित असलेल्या कामांचा आढावा काकाणी यांनी घेतला.
पदभार स्विकारताच केली पाहणी
यावेळी ऑरिकचे सहसंचालक जितेंद्र काकुस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. काकाणी यांनी 1 जून रोजी व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारताच त्यांनी 3 जून रोजी ऑरिक सिटीला भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.
राज्यातील पहिलीच औद्योगिक वसाहत
ऑरिक लगत असलेल्या रेल्वे ब्रीज येथे अंडरपासचे बांधकाम सुरु आहे. या कामाचीही काकाणी यांनी पाहणी केली. याशिवाय विद्युत परवाना मिळालेली ऑरिक सिटी ही राज्यातील पहीलीच औद्योगिक वसाहत आहे. यासाठी ऑरिक सिटीच्यावतीने कागदपत्रांची पुर्तता केली आहे. अद्याप परवाना प्रमाणपत्र हाती पडणे बाकी आहे. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठीच्या सुचनाही त्यांनी केल्या.
52 टक्के जागेचे वाटप
ऑरिक सिटीमधील 52 टक्के जागेचे वाटप झालेले आहे. याठिकाणी 70 कंपन्या कार्यरत आहेत. यासह बिडकीन डिएमआयडीचाही त्यांनी आढावा घेतला. मेडिकल डिव्हाईस पार्क, फुड पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पांची स्थिती समजून घेतली.
रस्त्याचे काम लवकरच
ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी तयार करण्यात येणारा इंटरचेज रस्त्याचे काम येत्या आठवड्यात सुरु होणार आहे. 31 मार्च रोजी जमीनीचा आगाऊ ताबा दिला आहे. सध्या आवॉर्डची प्रक्रीया सुरु आहे. 4 हेक्टर 5 गुंठे जमीन यासाठी अधिग्रहित केली आहे. मात्र, या जमिनीचे मालक असलेले 20 शेतकरी जमिनीचा भाव वाढवून मिळावा यासाठी कोर्टात गेलेले आहेत. यामुळे या प्रक्रीयेत काही अंशी उशीर झाला आहे. पण, आता शासनाने आक्रमक पाऊले उचलत काम सुरु केले आहे, अशी माहिती विशेष उपविभागीय अधिकारी रामेश्वर राेडगे यांनी यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.