आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रख्यात उद्योजक विजय हुलसुरकर यांचे निधन:औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात तरुण उद्योजकांची संघटना उभारण्यात होता मोठा वाटा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रख्यात उद्योजक , बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचे मुख्य समन्वयक विजय मनोहर हुलसुरकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. आज दुपारी प्रतापनगर स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्हीजेटीआय मधून टेक्सटाइल इंजिनियरिंग करून त्यांनी औरंगाबाद येथे स्वतः चा उद्योग सुरू केला. प्रोडक्ट डिझायनिंग सह प्रोडक्शन हे त्यांच्या उद्योगाचे वैशिष्टय. औरंगाबाद उद्योग क्षेत्रात तरुण उद्योजक संघटना उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.

चार भव्य अधिवेशने यशस्वीरीत्या आयोजित

तत्कालीन तरुण उद्योजक संघटनेचे ( आताची मासिआ) सलग चार वेळा त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते. यासोबतच एमएसएसआयडीसी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. विजय हुलसुरकर यांचे ब्राह्मण समाजासाठी मोठे योगदान होते. मराठवाडा पातळीवर त्यांनी बहुभाषिक ब्राह्मण संघटना उभारून चार भव्य अधिवेशने यशस्वीरीत्या आयोजित केली.

आजारपणामुळे सामाजिक कार्यातून अलिप्त

वर्किंग वूमन हॉस्टेल, युवा वर्गासाठी स्वयंरोजगार शिबिरांचे आयोजन आदी योजना हाती घेऊन त्यांनी योगदान दिले होते. आजारपणामुळे गेली काही वर्ष सामाजिक कार्यातून अलिप्त असलेले विजय यांचे गुरुवार सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अक्षय, सून, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

यांची होती उपस्थिती

त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, अनिल भालेराव, लघु उद्योग भारतीचे आबासाहेब देशपांडे, राम भोगले, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अर्जुन गायके, डॉ. मकरंद पैठणकर, केशव पारटकर, किशोर शितोळे, रंगनाथ काळे, समीर राजूरकर, प्रदीप पाटील, यांच्यासह उद्योग तसेच राजकीय क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

बातम्या आणखी आहेत...