आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट नाट्य:औरंगाबाद महापालिकेच्याएकनाथ रंगमंदिराचे भाडे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पुणे बालगंधर्वचे भाडे 13 हजार, जळगाव 3, सोलापूर 7, नाशिकचे 14 हजार रुपये

साडेआठ कोटी रुपये उधळपट्टी केल्यावरही खुर्च्यांच्या दोन रांगात पुरेसे अंतर नाही. शेवटच्या रांगेत रंगमंचावरील आवाज नीटपणे पोहोचत नाही. आसनांची संख्या किमान ७४ ने कमी झाली. हे सर्व लक्षात घेता महापालिका संत एकनाथ रंगमंदिराचे भाडे सर्वांना परवडेल असेच ठेवेल, अशी तमाम रंगकर्मी, कार्यक्रमांचे आयोजक, नाट्य ठेकेदारांची अपेक्षा होती. पण झाले भलतेच. ठेकेदाराच्या घशात रंगमंदिर घालण्यापूर्वी त्याला कमाईचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली. एका शोचे भाडे आठ हजारांवरून २० हजारांवर करण्यात आले. यामुळे स्थानिक रंगकर्मींना प्रचंड धक्का बसला आहे. ही भाडेवाढ म्हणजे स्थानिक सांस्कृतिक चळवळीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने काही प्रमुख शहरांतील नाट्यगृहांची माहिती घेतली असता संत एकनाथचा दर खूप अधिक असल्याचे दिसते.

केवळ औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्यातील नाट्य चळवळीत संत एकनाथ रंगमंदिराचे मोठे योगदान आहे. पाच वर्षांपूर्वी या नाट्यगृहाची देखभाल, दुरुस्तीअभावी बिकट अवस्था झाली. त्याबद्दल प्रशांत दामले, सुमीत राघवन आदी कलावंतांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. स्थानिक कलावंतांनी आरडाओरड केल्यावर तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी ५० लाखांची तरतूद केली. ती शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करत ८ कोटी ५० लाखांपर्यंत नेली. नुकतेच नूतनीकरण पूर्ण झाले आणि भाडेवाढ जाहीर झाली.

२००८ पासून संत एकनाथ रंगमंदिरात नाटकासाठी ६ हजार ५८० रुपये, सांस्कृतिक कार्यक्रम ८ हजार ५९०, शाळेचे स्नेहसंमेलन ४ हजार ८७० रुपये भाडे होते. आता लावणीसाठी ३०,०००, नाटकासाठी २५ हजार रुपये, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी १५ हजार रुपये भाडे ठरवण्यात आले आहे. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने माहिती घेतली असता पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडे १३ हजार, जळगावचे ३, सोलापूरचे ७, नाशिकच्या कालिदास रंगमंदिराचे १४ हजार रुपये असल्याची माहिती मिळाली.

एवढा खर्च परवडतच नाही
एका नाटकाला २० हजार भाडे, २५ हजार रुपये अनामत द्यायची. एवढा खर्च करणे खरेच परवडतच नाही. महानगरपालिका प्रशासनाने कलाकारांच्या हिताचा थोडासा तरी चांगला विचार करून भाडे कमी करावे. अन्यथा नाट्यप्रयोग परवडणार नाही संदीप सोनार, सार ग्रुप

पुढील महिन्यातील नाटक रद्द
कोरोनामुळे बंद पडलेले नाट्यजगत आता कुठे पावले टाकत आहे. त्यात ही भाडेवाढ झाली. म्हणून एप्रिलमधील काही नाटके, कार्यक्रम रद्द करावे लागले. नवीन भाडेवाढीचा तिकीट दरावर परिणाम होईल. रसिकांच्या खिशाला झळ पोहोचेल. राजू परदेशी, परदेशी अॅड्स

तापडियाशिवाय पर्याय नाही
ही भाडेवाढ स्वखर्चाने सांस्कृतिक चळवळीची जोपासना करणाऱ्यांचा उत्साह चिरडणारी आहे. हिंदी-मराठी गीतांच्या मैफलींना तापडिया नाट्य मंदिराशिवाय पर्याय नाही, अशी व्यवस्था मनपा करत आहे. या संदर्भात अधिकारी डॉ. अपर्णा थेटे यांना निवेदन देणार आहोत. नीरज वैद्य, प्रख्यात गायक

सांस्कृतिक कला जपणाऱ्यांना सूट द्या
आम्ही भारतीय कलेचा प्रचार, प्रसार करतो. ही भाडेवाढ न परवडणारी आहे. एकीकडे शास्त्रीय कला लुप्त होत आहे. त्यांना पुढे आणणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सांस्कृतिक कला जपणाऱ्यांना भाड्यात ६० टक्के सवलत मिळावी, अशी आम्ही मागणी करु. विक्रांत वायकोस, कलाश्री अकादमी

ठेकेदाराचा मार्ग सोपा करण्यासाठी
नूतनीकरणानंतर एकनाथ रंगमंदिर ठेकेदाराला देण्याचे ठरले. रंगकर्मींमध्ये फूट पडल्याने त्या निर्णयाला फारसा विरोध झाला नाही. हे लक्षात आल्यावर प्रशासनाने भाडेवाढ जाहीर केली. त्या पाठोपाठ दरवर्षी किमान १५ लाख रुपयांच्या हमीवर ठेकेदाराला रंगमंदिर सोपवण्याची निविदा प्रसिद्ध केली. म्हणजे वाढीव भाड्यासह खासगीकरण करून ठेकेदाराच्या कमाईचा मार्ग सोपा करण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...