आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीतून वाढणार पाणी:अडीच हजार कोटी खर्चून कालव्यांची दुरुस्ती, महिनाभरापासून सुरू आहे सर्वेक्षणाचे काम

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणातून एक लाख ८४ हजार हेक्टर सिंचन होते. मात्र जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी मराठवाड्यात पाणी वाहून नेण्याची क्षमता ५० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे जलसंपदामंत्र्यांनी त्याचे सर्वेक्षण आणि डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या कालव्यासाठी अडीच ते तीन हजार कोटींचा खर्च येणार आहे.

जायकवाडीतून शेतकऱ्यांना शेवटपर्यंत पाणी मिळत नाही, अशी कायम तक्रार केली जाते. गेल्या ४६ वर्षांत कालवा आणि चाऱ्याची अवस्था वाईट आहे. जायकवाडीचा डावा कालवा २०८ किमीचा तर उजवा १३२ किमीचा आहे. हे दोन्ही कालवे फुटलेले असल्यामुळे ते दुरुस्त करण्यात यावेत याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. १९७६ पासून नंतर पहिल्यांदाच या कालव्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

१९७६ नंतर पहिल्यांदाच होतेय कालव्यांचे सर्वेक्षण
कालव्यांच्या दुरुस्तीनंतर वाढणार वहनक्षमता

जायकवाडीतून औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्यातून संकल्पित वहन क्षमता ३६०० क्युसेक असताना १८०० आणि उजव्यातून २२०० क्युसेक वहनक्षमता असताना १००० क्युसेकने पाणी सोडावे लागते. खराब झालेल्या कालव्यामुळे वहनक्षमता ५० टक्क्यांनी घटली आहे. कालव्यांत १० ते १५ फुटांपर्यंत झाडेझुडपे वाढल्याने कालवे फुटले आहेत. पाणीपाळी १४ दिवसांत देणे अपेक्षित असते त्यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालवाधी लागत आहे.

अशा आहेत जायकवाडीच्या वितरिका
1350 पैठणच्या डावा कालव्याच्या चाऱ्यांची (वितरिका) लांबी
630 उजव्या कालव्याच्या चाऱ्यांची लांबी
60 टक्के चाऱ्या नादुरुस्त आहेत

सर्वेक्षणासाठी २ कोटी ९५ लाख
या सर्वेक्षणासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. सर्वेक्षण एक महिन्यापासून सुरू असून त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सर्वेक्षणानंतर तीन महिन्यांतच डीपीआर तयार करण्यात येणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सहायक अधीक्षक जे. एन. हिरे यांनी दिली.

पाण्याची बचत होईल जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती केल्यानंतर पाण्याची बचत होईल. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होईल. सध्या पाणीपाळी जी ३० दिवस सुरू ठेवावी लागते त्याचे दिवस कमी होऊन पाण्याची बचत होईल. सर्वेक्षण आणि डीपीआर सहा महिन्यांत तयार करण्यात येऊन त्यानंतर शासनाला सादर करण्यात येणार आहे. - जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता.

सलग चौथ्या वर्षी जायकवाडीचा साठा जूनमध्ये ३३ टक्क्यांवर
रमेश शेळके| पैठण

जायकवाडी धरण सलग मागील चार वर्षांपासून शंभर टक्के भरले. यातून याच चार वर्षांत दरवर्षी पावसाळ्याच्या ताेंडावर म्हणजे जूनमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा याच महिन्यात शिल्लक राहिला. यंदा मात्र बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक वाढले असतानाही सध्या ३३.६९ टक्के तर मागील वर्षी ३४.९७ टक्के साठा हाेता, अशी माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली. यात यंदा देखील हवामान विभागाने जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असल्याने धरण शंभर टक्के भरणार, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यात जून महिना सुरू झाला असून मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने सलामी दिली आहे. सध्या पाण्याची मागणी उन्हाळ्यातील मार्च एवढी असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.

जून महिना सुरू असला तरी सध्या तापमानाचा पारा ३८ अंशांवर आहे. यातच सर्व उद्योग सुरळीत सुरू असल्याने उद्योगाचा पाणी व पिण्यासाठीच्या पाण्यात पाच वर्षांत दहा टक्के वाढ झालेली आहे. यात पाणी वाटपाचे धोरण व नियोजन मात्र अजूनही दहा वर्षांपूर्वीचे आहे. परिणामी पैठणला एक दिवसाआड तर औरंगाबादला तीन-चार दिवसांतून एकदाच पाणी मिळते. दरम्यान, जायकवाडीतून औरंगाबाद, वाळूज, चिकलठाणा, शेंद्रामधील बजाज, गरवारे, स्कोडा, इंजिनिअरिंग, केमिकल, औषधीसह बिअर उद्योगाला अधिक पाणीपुरवठा होतो.

जायकवाडीची सद्य:स्थिती 2909 दलघमी एकूण पाणीसाठा 2171 दलघमी उपयुक्त पाणीसाठा 738 दलघमी मृत पाणीसाठा 33.69 टक्के सध्याचा पाणीसाठा 34 % मागील वर्षीचा पाणीसाठा 00 दलघमी बाष्पीभवन

...तर मागणी कमी होईल
सध्या धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. बाष्पीभवन १.७७ हून अधिक आहे. एमआयडीसी व पिण्यासाठीचा कोटा आहे तेवढा आहे. मात्र लोकसंख्या व सध्याची पाण्याची गरज बघता दहा टक्के तरी पाणी अधिक लागते. पाऊस झाला तर पाण्याची मागणी कमी होईल.
- विजय काकडे, अभियंता, पाटबंधारे विभाग

बातम्या आणखी आहेत...