आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इनसाइड स्टोरी:8 तास अभ्यास करून मुंबईला पाठवला राज ठाकरेंच्या भाषणाचा अहवाल, 15 तासांनंतर गुन्हा नाेंदवण्याचे आदेश

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजीची सभा नऊच्या ठोक्याला संपली आणि दुसऱ्याच मिनिटाला मुंबईतून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. मंत्र्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शहर पोलिस अधिकाऱ्यांमध्ये संवाद झाला. सोमवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात दैनंदिन कामकाजाला प्रारंभ होताच अकरा वाजता सायबर पोलिस ठाण्यात राज यांचे भाषण बारकाईने ऐकून त्यातील वाक्य न वाक्य तपासून अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले. पाच तास अधिकाऱ्यांनी भाषण पुन्हा पुन्हा ऐकले. महत्त्वाच्या नोंदी केल्या. एकूण आठ तासांनंतर आक्षेपार्ह विधानांसह सविस्तर अहवाल तयार झाला. तो वरिष्ठांसमोर सादर करण्यात आला. वरिष्ठांनी तो अंतिम करत मुंबईला पाठवला. तेथून मंगळवारी सकाळी अकरा वाजता गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी झाले आणि ३ वाजून १९ मिनिटांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे, सभेचे अर्जदार राजीव जावळीकर यांच्या विरोधात १२७ क्रमांकाचा एफआयआर तयार झाला.

वादग्रस्त विषयामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरता आठ दिवस सभेच्या परवानगीसंदर्भात तर्कवितर्क लावले गेले. परवानगीच मिळणार नाही, अशीही चर्चा होती. प्रत्यक्षात २८ एप्रिल रोजी सायंकाळी १६ अटींसह परवानगी देण्यात आली. रविवारी ५० मिनिटांच्या भाषणात ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध भूमिका घेतली. त्यांची वक्तव्ये चिथावणी देणारी आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीवरून गुन्हा
मुंबईत पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हे सभेच्या अनुषंगाने भूमिका मांडतील, असे माध्यमांना सांगितले. त्यापूर्वीच सिटी चौक पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले. सिटी चौक ठाण्यात सात महिन्यांपासून कार्यरत विशेष तपास पथकाचे गजानन इंगळे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली. उपनिरीक्षक एस. एस. हिवराळे यांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठांच्या आदेशावरून निरीक्षक पोलिस अशोक गिरी यांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले.

कुणाचीही गय नाही
शहरात अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये. काही कळल्यास तत्काळ आम्हाला कळवा.
- डॉ. निखिल गुप्ता, आयुक्त.

संपूर्ण भाषण शब्दश: लिहून काढले
राज यांची वादग्रस्त विधाने व हनुमान चालिसा आंदोलनाच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मुंबईतून ‘मार्गदर्शन’ सुरू हाेते. सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्याचे अादेश अाले. त्यानुसार ११ वाजता सायबरचे निरीक्षक गौतम पातारे यांनी भाषणाचे रेकॉर्डिंग ऐकण्यास सुरुवात केली. ११.३० च्या सुमारास उपायुक्त अपर्णा गिते, सीआयडीचे अधीक्षक निकेश खाटमोडे दाखल झाले. सर्व वरिष्ठांनी भाषण ऐेकले. मग संपूर्ण भाषण शब्दश: लिहून काढण्यात आले. पुन्हा पुन्हा भाषण ऐकत बारकावे टिपले. तेही लेखी भाषणात समाविष्ट केले. रात्री आठ वाजेपर्यंत सखोल अहवाल तयार झाला. नंतर तो पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आला.

४५ पदाधिकाऱ्यांना नोटिसा
मनसे जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर अक्षय्य तृतीयेची घरी कुटुंबासह पूजा करत असतानाच पाेलिस निरीक्षक गीता बागवडे, अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घरी गेले. खांबेकरांसह जावळीकर व सतनाम गुलाटी यांना तेथे १४९ अन्वये नोटीस बजावली. ४५ पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यात म्हटले आहे की, मशिदीसमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करत असल्याचे वृत्त असून त्यामुळे शांतता व कायदा व सुव्यवस्था भंग होऊ शकते. या सूचनापत्रानंतरही गुन्हा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

ईद कार्यक्रमात मनसे सहभागी
एकीकडे मनसे विरुद्ध मुस्लिम समाज असे चित्र असताना वाळूज एमअायडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबेलोहळ येथे ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर सहभागी झाले. त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत शिरखुर्म्याचाही आस्वाद घेतला.

वाळूजमध्ये १० जणांना नोटिसा
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनसेच्या १० पदाधिकाऱ्यांना कलम १४९नुसार ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी नाेटीस बजावली. यात जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, वाळूज महानगर विभाग अध्यक्ष सुशांत भुजंगे, शहर उपप्रमुख पश्चिम, विद्यार्थी सेनेचे अभिजित गायकवाड आदींचा समावेश आहे.

पोलिस पूर्ण तयारीनिशी सज्ज
मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. अाज पहाटेपासूनच शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त होईल. ३ पोलिस उपायुक्त, ३ सहायक पोलिस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १२४८ कर्मचारी रस्त्यावर असतील. ४२ मशिदींजवळ २८ सहायक निरीक्षक व १५४ शस्त्रधारी जवान गस्त घालतील. ३८ संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात असेल. राज्य राखीव दल व दंगाकाबू पथकाचे जवानही तैनात असतील.
रमजान ईद व मनसेने बुधवारी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे मंगळवारी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.

बातम्या आणखी आहेत...