आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगपुऱ्यात आंदोलन:एमपीएससी उमेदवारांचा पुन्हा संताप; वेळापत्रकानुसार परीक्षा घेऊन तत्काळ नियुक्त्या देण्याची आक्रमक मागणी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारविरोधात उमेदवारांची घाेषणाबाजी; अटकाव करणाऱ्या पोलिसांवरही रोष

एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे त्याचा बळी गेल्याचा अाराेप करत अाैरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात सोमवारी सुमारे पाचशे ते सहाशे उमेदवारांनी आंदोलन केले. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, यूपीएससीप्रमाणेच वर्षाचे वेळापत्रक जाहीर करून नियोजित वेळेत एमपीएससी परीक्षा घेऊन नियुक्त्या देण्याची मागणी या वेळी करण्यात अाली. पोटाला चिमटा घेऊन पालक शिकवतात. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय.

सध्या लॉकडाऊनमुळेे मेस एक वेळच सुरू असते. घरभाडेदेखील वाढले अाहे. आमची व्यथा कुणाला सांगायची, असा सवाल तरुणांनी केला. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. धक्काबुक्की झाली. एका अांदाेलनकर्त्यास पोलिसांनी चापट मारल्याने तणाव निर्माण झाला हाेता. नंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, काही राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, क्लासेस चालक मध्येच अांदाेलनस्थळी अाले. मात्र, पोलिस येताच ते निघून गेले. मात्र आमचे आंदाेलन राजकीय पक्षांशी संबंधित नसल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केेले.

दाेन वर्षांपूर्वी तहसीलदारपदी निवड हाेऊनही नियुक्ती नाही
एमपीएसीच्या ‘गट ब’साठी २४ मार्च २०१९ रोजी परीक्षा झाली हाेती. पुढील प्रक्रिया अजून झालेली नाही. २०२० ची जाहिरात अद्याप नाही. कम्बाइन ग्रुप सीच्या परीक्षेची जाहिरात दोन वर्षांपासून आलेली नाही. जे उमेदवार ‘स्पेशल ग्रुप सी’ची तयारी करत अाहेत, त्यांचे भविष्य अधांतरी आहे. शेवटची परीक्षा १६ जून २०१९ रोजी झाली होती. दोन वर्षांपूर्वी तहसीलदारपदी निवड झालेले नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या ११४५ पदांसाठी जून व नाेव्हेंबर २०१९ मध्ये परीक्षा झाल्या. आठ महिन्यांनी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला.पण हे ३६०० उमेदवार अजूनही मुलाखतीच्या प्रतीक्षेतच आहेत.

११ मार्चला याच ठिकाणी झाले हाेते अांदाेलन
११ मार्च २०२१ राेजी काेराेनामुळे एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात अाली हाेती. या परीक्षेसाठी अालेल्या शेकडाे तरुणांचा हिरमोड झाला. त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ एकत्र येत तीव्र अांदाेलन केले हाेते.

कुटुंबीय म्हणतात, ‘बस झाले, आता घरी परत या’
मी चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयार करतेय. त्यासाठी वैजापूरहून औरंगाबादेत आले. पण २ वर्षांपासून परीक्षाच झाली नाही. आर्थिक चणचण भासतेय. वयही वाढतेय. त्यामुळे कुटुंबीय म्हणतात, बस झाले, परत ये. - जयश्री निगळ, परीक्षार्थी

आता तरी ठाेस निर्णय घ्या
दोन वर्षांपासून परीक्षा नाही. शासनाने कोणतेही नियोजन केले नाही. याचा परिणाम तरुणांच्या मानसिकतेवर होतो आहे. अाता तरी ठाेस निर्णय घ्यावा. - पूजा लकडे, परीक्षार्थी

शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार सरकारने करायला हवा
मागील आंदाेलनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या परीक्षांबाबत घोषणा करून अाश्वासन दिले होते. मात्र अाता नुसतीच घोषणा न करता वेळापत्रकानुसार परीक्षा, निकाल आणि नियुक्तीसाठी तातडीने अंमलबजावणी हवी. गरीब शेतकऱ्यांची मुले शहरात शिक्षणासाठी येतात. त्याचा तरी विचार करावा. - ज्ञानेश्वर जाधव, परीक्षार्थी

बातम्या आणखी आहेत...