आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका:औरंगाबाद, नांदेडसह 9 महापालिका निवडणुकांसाठी उद्या होणारी आरक्षण सोडत स्थगित

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यामुळे उद्या (ता. 5 ऑगस्ट) होणारी 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.

औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या 9 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. ती आता काढण्यात येणार नाही.

अधिसूचनाही प्रसिद्ध होणार नाही

त्याचबरोबर अन्य 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 14 महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.

निवडणुका लांबणीवर

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद व महानगरपालिकांमधील प्रभाग रचना घटवल्याने प्रभाग रचना पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. ज्या प्रभागांतील आरक्षणाची सोडत झालेली आहे. मात्र आता पुन्हा नव्याने प्रभाग आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. प्रभाग रचना बदलल्याने मतदार याद्या नव्याने बनवाव्या लागणार आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जातील.

बातम्या आणखी आहेत...