आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवालय:बहिष्काराचा विरोध पत्करून, अनुदानाविना एचआयव्ही बाधितांसाठी कायम काम करणार : रवी बापटले

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारितेचे शिक्षण घेऊन काम करताना एचआयव्हीबाधित मुलाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. त्याच वेळी अशा मुलांसाठी काम करण्याचे ठरवले. गावातील लोकांनी सेवालय उभारण्यास विरोध केला, लिखित बहिष्कारही केला. परंतु शासकीय अनुदानाविना काम करत असल्याचा आनंद आहे, असे रवी बापटले यांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हासेगाव येथे एचआयव्हीबाधित मुलांसाठी रवी बापटले यांनी सेवालय उभारले. शहरात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे त्यांना पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार देण्यात आला. तत्पूर्वी बोलताना ते म्हणाले की, १९९९ ते २००७ पर्यंत पत्रकारितेमध्ये काम केले. २००७ मध्ये एचआयव्हीग्रस्त मुलाचा उपचाराअंती मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी पाहून अशा मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबापासून विभक्त राहण्याचा आणि लग्न न करण्याचा निर्णय कुटुंबाला मान्य नव्हता.

१८ मुलांची लग्ने लावली : माळरानावर एका शेतकऱ्याने साडेसहा एकर पडीक जमीन दिली. त्या ठिकाणी लाइट घेण्यासाठीसुध्दा परवानगी देत नव्हते. अशा वेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सहा महिन्यांनंतर लाइट मिळाली. गावातून विरोध पत्करून काम कायम ठेवले. बघता बघता ८५ मुले आली. त्यांना ज्या शाळेत टाकले, गावकऱ्यांनी तेथून आपली मुले काढून टाकली होती. आज सेवालयातील मुलांचे विविध ठिकाणी शो होतात. ९६ शोमधून मिळालेल्या देणगीतून दीड कोटी जमले. यातून १५ एकर शेतजमीन घेतली. एवढेच नाही तर १८ मुलांची लग्ने लावली, सून, जावई, नातवंडे आली. शेतीतून केळी, ड्रॅगनफ्रूट, सेंद्रिय भाजीपाला, गोमूत्र यातील उत्पन्नातून सेवालयाचे कार्य सुरू आहे. आज सेवालयातील २२ मुले दहावीनंतरचे शिक्षण घेत असून एक मुलगी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाली.

लग्नापूर्वी एचआयव्हीची तपासणी करायला पाहिजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे रवी बापटले यांना स्मृतिचिन्ह, २१ हजार रुपये स्वरूपात पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वऱ्हाडे यांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, समाजात एचआयव्ही बाधितांची संख्या कमी दिसत असली तरी १४ ते २९ वयोगटात सर्वाधिक बाधित होत आहेत. लग्नापूर्वी एचआयव्हीची तपासणी करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रा. जीवन देसाई, प्रा. सुरेश पुरी, डॉ. रश्मी बोरीकर, प्रा. मंगल खिंवसरा, सारंग टाकळकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...