आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदीचा रत्नजडित हार अर्पण:मंदिर पुनर्निर्माण, गोशाळा, वेद अभ्यास केंद्राचा संकल्प ; अथर्वशीर्ष पठणात 250 युवकांचा सहभाग

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती ट्रस्ट, भक्ती गणेश ट्रस्ट, श्री गणेश महासभा देवस्थानांच्या माध्यमातून भाविकांसाठी मंदिर पुनर्निर्माण कार्य, गो-शाळा, वृध्दाश्रम, वेद अभ्यास केंद्राची स्थापनेसह अन्नछत्रालय करणार, असा संकल्प देवस्थानचे अध्यक्ष, सचिवांनी घेतला. शहरात बुधवारी गणेश जयंती मोठया उत्साहात साजरी झाली.

सिडको एन-१ काळा गणपती मंदिरात आरती, प्रसादाचे वाटप सिडको एन-१ येथे दिलीप डांगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव एस.एम. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संपूर्ण मंदिराचा गाभारा दोन क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आला होता. भाविकांसाठी ३ क्विंटलची बुंदी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. या वेळी भक्ती गणेश ट्रस्टचे सचिव एस. एम. कुलकर्णी म्हणाले, गणेश मंदिराला दोन ते चार एकर जागा हवी आहे. त्यावर वृध्दाश्रम, गोशाळा, मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क आणि अभ्यासिका असे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जागेची पाहणी केली आहे.

वरद गणेश मंदिरातील शिबिरातून ५२ दात्यांनी केले रक्तदान समर्थनगरातील वरद गणेश मंदिरात गणेश रामदासी यांच्या कीर्तनासह त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या वेळी मंदिराचे अध्यक्ष मनोज पाडळकर यांची उपस्थिती होती. गणेश मूर्तीला सुवर्णालंकार घालवून सजविण्यात आले होते. मंदिराच्या वतीने ३ हजार भाविकांसाठी १७० किलोचा मसाले भात, २०० किलोची भाजी, २ क्विंटलची पुरी, सव्वाशे किलोचा दलियाची खीर करण्यात आली. मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.महिनाभरात अन्न छत्रालय सुरू करणार आहे. वेद अभ्यास केंद्र सुरू करण्याचा संकल्प घेतल्याचे पाडळकर म्हणाले.

राजाबाजार संस्थान गणपती मंदिरात २१ कुंडी गणेश याग राजाबाजार संस्थान गणपती मंदिर ट्रस्टतर्फे सकाळी पं. विजयकुमार पल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात २१ कुंडी गणेश याग होमहवन करण्यात आले. यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चिचाणी, प्रफुल्ल मालाणी उपस्थित होते. दोन हजार भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंदिराच्या विकासासाठी ३ हजार स्क्वेअर फूट जागा लागते. त्यासाठी मंदिराजवळील जागा विकत घेतली आहे. मंदिराच्या पाठीमागील जागासुध्दा घेण्याचे ठरले आहे. येथे मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचा संकल्प केल्याचे मालानी म्हणाले.

शिवस्वराज्य प्रतिष्ठानतर्फे चढवला दीड किलोचा चांदीचा रत्नजडित हार औरंगपुरा येथे शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने अथर्वशीर्ष पठणात २५० युवकांनी सहभाग घेतला. यानंतर श्री गणेश याग, महापूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींचा जन्मोत्सव वाद्यवृंदांच्या गजरात पार पडला. रक्तदान शिबिरात ९० जणांनी रक्तदान केले. यावेळी नामदेवराव पवार यांच्याकडून श्रींच्या चरणी दिड किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला. तसेच कोकणी पद्धतीचे मंदिर व त्यास साजेशी अशी आरास व सजावट करण्यात आली होती. युवकांना रोजगार सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, सहाय्यक करण्याचा मानस माजी आमदार नामदेव पवार यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...