आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:आठ लाख रु. पीएफ हडपल्याचे बिंग फुटताच निवृत्त एसटी चालकाचा खून, शिर धडावेगळे करून विहिरीत फेकले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी पोलिसांनी एसटीच्या लिपिकासह 2 जणांना अटक केली आहे

एसटी महामंडळातून निवृत्त झालेले चालक मुजीब अहेमद खान आबेद रशीद खान (५९, रा. शहानगर, बीड बायपास) यांची खोटी सही करून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची आठ लाखांची रक्कम हडपल्याचे बिंग फुटताच एसटीतीलच लिपिकाने त्यांचा गळा चिरून िनर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी लिपिक अतिक अमीर काझी (३५, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट) आणि अफरोज खान जलील खान (३५, रा. रेणुकामाता मंदिर कमानीजवळ, सातारा परिसर) यांना अटक केली.

मुजीब खान हे डिसेंबर २०१९ मध्ये निवृत्त झाले. सेवानिवृत्ती आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयात अर्ज केला होता. ९ जुलै रोजी दुपारी ते समर्थनगर येथील विभागीय कार्यालयात गेले होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा मुलगा रशीद याने क्रांती चौक पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. नातेवाइकांनी अतिकवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून दोन दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू होती.

खात्यातून काढले ८ लाख रुपये : मुजीब यांनी निवृत्तीची रक्कम काढण्यासाठी विभागीय कार्यालयातील लिपिक अतिक काझीकडे एका कोऱ्या चेकवर सह्या करून दिल्या होत्या. त्यानंतर ते धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी गेले. परत आल्यानंतर त्यांनी अतिककडे पैशासाठी तगादा सुरू केला. मात्र, तोपर्यंत अतिकने बनावट सह्या करून पुष्पनगरी रस्त्यावरील स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँकेतून मुजीब यांच्या खात्यातील आठ लाख रुपये काढून घेतले होते. तसेच एसटीच्या रेकॉर्ड बुकवरही बनावट सह्या केल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर मुजीब यांनी अतिकला पैसे दे, अन्यथा पोलिसांत फसवणुकीची तक्रार देईन, असे धमकावले होते.

कारमधून अपहरण केले

९ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मुजीब यांनी अतिकला विभागीय कार्यालयात गाठले. त्याच्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर त्याने मुजीब यांना कारमध्ये बसवून देवळाई येथील नातेवाइकाकडून रक्कम आणू, असे सांगितले. तेव्हा मुजीब यांनी पत्नीला फाेन करून अतिकसाेबत कारने जात असल्याचे सांगितले होते. अतिकने वर्गमित्र असलेल्या अफरोज खानच्या घरी कार नेली. काही वेळ त्यांना बसवून ठेवले. अचानक त्यांचे तोंड दाबून पाठीमागून लोखंडी रॉडने वार केला. ते बेशुद्ध होताच तीक्ष्ण हत्याराने त्यांचे शिर कापून धडावेगळे केले.

सीसीटीव्ही फुटेजवरून लागला तपास : मुजीब यांच्या नातेवाइकांनी अतिकवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहायक फौजदार नसीम पठाण, जमादार सलीम सय्यद, पोलिस नाईक राजेश फिरंगे, शिपाई मनोज चव्हाण, मिलिंद भंडारे, संतोष रेड्डी, दयानंद मरसाळे यांच्या पथकाने रविवारी विभागीय कार्यालयातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात मुजीब हे सायकल उभी करून कार्यालयात जाताना दिसले. तसेच अतिकदेखील बाहेर पडताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिकच्या कारची तपासणी करण्यासाठी रविवारी बीड बायपास रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्याची कार काही वेळेच्या अंतराने जाताना आणि येताना दिसली. त्यानंतर अतिकला पकडून खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात रशीद खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईदच्या दिवशीही करायचे ड्यूटी : मुजीब यांना २ मुले आणि १ मुलगी आहे. त्यांचा एक मुलगा कार मेकॅनिक, तर दुसरा बीएस्सी बायोटेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. त्यांचे भाचे काझी कलिमुल्ला यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबात ते इमानदार व्यक्त म्हणून प्रसिद्ध हाेते. ईदच्या दिवशीदेखील ते ड्यूटी करायचे. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. परिसरातील मुलांना कुराण शिकवणे तसेच अशिक्षितांना लिहायला-वाचायला शिकवण्याचा त्यांना छंद होता.

खासदारांमुळे तपासाला वेग : मुजीब हे बेपत्ता होताच त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता त्यांच्या नातेवाइकांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर नातेवाइकांनी खासदार इम्तियाजला जलील यांची भेट घेऊन तपासासाठी पाेलिसांना सूचना करण्याची विनंती केली. त्यानंतर खासदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने तपास करण्याच्या सूचना केल्या हाेत्या.

मुजीब यांची सायकल उभीच

मुजीब हे सायकलने विभागीय कार्यालयात गेले होते. त्यांनी कार्यालयाच्या पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका विजेच्या खांबाला सायकल उभी केली होती. त्यांची सायकल ९ जुलैपासून सोमवारपर्यंत त्याच ठिकाणी उभी होती.

शिर ठेवलेले पोते पडक्या खोलीजवळील झुडपात

खून केल्यानंतर आराेपी अतिक व अफरोजने सिमेंटचे एक पोते रिकामे केले. त्यात मुजीब यांचे धड टाकून त्यावर सिमेंट आणि दगड टाकले. त्यानंतर शिर दुसऱ्या पोत्यात टाकून ते कारमध्ये टाकून सोलापूर-धुळे महामार्गाजवळील एका विहिरीजवळ गेले. तत्पूर्वी त्यांनी मुजीब यांचा मोबाइल व त्यातील सिमकार्ड सातारा परिसरात एका ठिकाणी फेकले. धड असलेले पोते विहिरीत तर शिर ठेवलेले पोते झाल्टा फाट्याजवळील एका पडक्या खोलीजवळील झुडपात फेकले.