आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोतील घटना:लष्करातील निवृत्त जवानाच्या मुलाची पोलिसांना धक्काबुक्की

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्करातील एका सेवानिवृत्त जवानाच्या टवाळखोर मुलाने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलिस कर्मचारी त्याच्या दुचाकीवर बसून त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताच त्याने सुसाट वेगात, कर्कश हॉर्न वाजवत एन-७ परिसरात दुचाकी पळवली. त्यानंतरही “तुला बरबाद करतो,’ असे म्हणत ढकलून दिले. एवढा गंभीर प्रकार होऊनही निवृत्त जवान पोलिसांना “तुझा बक्कल क्रमांक सांग, मी सीपीला फोन करतो,’ असे म्हणतात. त्यानंतर आणखी एक तरुण पोलिसांची कॉलर पकडून निघून जाण्यास सांगताे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी रात्री सिडको पोलिस ठाण्याजवळ घडली, हे विशेष. अमोल राजेंद्र पाराशर असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी शुक्रवारी रात्री दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

डायल ११२ वर कर्तव्यास असलेले पोलिस कर्मचारी उत्तम शिवलाल जाधव ४ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता गस्तीवर होते. सिडको पोलिस ठाण्याजवळील रामलीला मैदानाजवळ एक बुलेटस्वार सायलेन्सरचा जाेरात आवाज करत गाडी उडवत होता. त्याने पोलिस दिसताच स्वत:हून जाधव यांच्या वाहनासमोर बुलेट उभी केली. नंबर प्लेट व कमांडो, खली, तर सायलेन्सरवर एके-४७ लिहिलेल्या बुलेटला नंबर का नाही, असे विचारताच “माझी गाडी आहे, मी नंबर टाकीन अथवा नाही टाकणार, तुला काय करायचे,’ असे उर्मटपणे सांगितले. त्यानंतर “तुझी बुलेट ठाण्यात घे,’ असे म्हणत जाधव यांनी त्याच्या मागे बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाराशरने ते बसताच सुसाट वेगात बुलेट चालवून “तुला बरबाद करतो,’ असे म्हणत घरासमोर नेऊन हाताने ढकलून दिले. एवढ्यावर न थांबता त्याने त्याच्या मित्राला बोलावून घेतले. त्यानेदेखील पोलिसाची कॉलर पकडली. तोपर्यंत इतरही पाेलिस कर्मचारी दाखल झाले होते. टवाळखोर मुलाच्या एवढ्या प्रतापानंतरही अमोलचे वडील राजेंद्र यांनी जाधव यांनाच उलट “तुझा बक्कल क्रमांक सांग, मी सीपीला बोलतो,’ अशी भाषा वापरली. ही सर्व घटना सिडको ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडत होती. मात्र, घटनेनंतर आराेपी फरार झाले. शनिवारपर्यंत दोघेही सापडले नव्हते. उपनिरीक्षक कैलास अन्नलदास तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...