आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:महसूल व पोलिस विभागाने रोखला ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार, 163 सिलिंडरचे वाटप

हिंगोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे महसूल व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत ऑक्सीजन सिलेंडर चा काळाबाजार रोखला. महसूल विभागाने 163 ऑक्सिजन सिलेंडर शासकीय व खासगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार वाटप केले

हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर व कवठा येथे रुग्णालयातील ऑक्सिजन आज पहाटे तीन वाजताच संपणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना दिली. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी चोरमारे तहसीलदार माचेवाड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी ऑक्सिजन पुरवठादाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी इतर रुग्णालयांमध्ये असलेले ऑक्सीजन सिलेंडर तातडीने सिद्धेश्वर व कवठा येथे पाठवले. दरम्यान नांदेड जालना येथून ऑक्सीजन सिलेंडर घेऊन शनिवारी ता. २४ रात्री निघालेले वाहन पहाटे तीन वाजेपर्यंत हिंगोलीत हा पोहोचले नाही. यावर संशय आल्याने संबंधित ऑक्सिजन पुरवठा दाराशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संबंधित पुरवठादारांनी अधिकारी यांचे दूरध्वनी घेतलेच नाही. त्यामुळे पहाटे साडेतीन वाजता हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना तातडीने बोलावून होत असलेल्या प्रकाराची माहिती दिली.

त्यानंतर अधिकाऱ्यांच्या या पथकाने संबंधित पुरवठादाराच्या दुकानाचा शोध घेतला. मात्र तेथे कोणीही आढळले नाही. त्यानंतर त्याच्या घराचा शोध घेऊन माहिती घेण्यात आली. मात्र तो घरी नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान आज सकाळी सात वाजता या पथकाने पुन्हा त्याच्या घरी जाऊन त्यास तातडीने पोलिस ठाण्यात येण्याचा निरोप दिला. संबंधित पुरवठादारास निरोप मिळाल्यानंतर तो आठ वाजता पोलिस ठाण्यात हजर झाला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण नांदेड येथे गेलो होतो असे सांगितले. मात्र पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन हिंगोलीत असल्याचे दाखवल्यानंतर मात्र त्याची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर त्यांनी सर्व माहिती महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना दिली.

जालना येथून ११३ सिलेंडर घेऊन निघालेले वाहन मंठा येथे थांबल्याची माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी तातडीने पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांना माहिती दिली. त्यावरून कलासागर यांनी औंढा चे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्याशी संपर्क साधून जिंतूर येथे पाठवले. मंठा येथील वाहन जिंतूर येथे पोहोचल्यानंतर पोलीस बंदोबस्तात हिंगोलीत आणण्यात आले. नांदेड येथून पन्नास सिलेंडर घेऊन आलेले वाहनही हिंगोलीत आणण्यात आले. त्यानंतर सदर वाहनांतील १६३ ऑक्सीजन सिलेंडर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय व खाजगी रुग्णालयांना आवश्‍यकतेनुसार वाटप करण्यात आले. पुरवठादारांनी नांदेड जालना जिल्ह्यातून येणारी वाहने रस्त्यात थांबवून सदरील वाहनातील सिलेंडर काळ्याबाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे मात्र महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रभर तपास चक्रे फिरवून ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार रोखला. पहाटे नऊ वाजता सर्व ऑक्सीजन सिलेंडर प्राप्त झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला.

चौकशी करून अहवाल सादर करणार : उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे

या प्रकरणांमध्ये संबंधित पुरवठादाराची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. याशिवाय पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहनांचे लोकेशन कुठे होते याचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...