आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 11.30 वा. अपघात:क्रांती चौकात भरधाव कारने रिक्षाला उडवले; गर्भवती महिलेसह 2 जखमी, कारही उलटली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार तपासताना पाेलिस.   - Divya Marathi
कार तपासताना पाेलिस.  

अमरप्रीत चौकाकडून क्रांती चौकाच्या दिशेने जाणाऱ्या अॅपे रिक्षाला एका भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक गरोदर प्रवासी महिला आणि रिक्षाचालक जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास क्रांती चौक उड्डाणपुलाजवळ घडली. धडक एवढी जोरात होती की सुमारे ५० मीटर अंतरावर जाऊन कार (एमएच २० एफपी ५४१४) उलटली. या घटनेनंतर चारचाकी वाहनातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.त्यामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. बघ्यांच्या गर्दीतून कारमधील चालकासह चार जणांनी घटनास्थळावरून पळ काढला.उस्मानपुरा, क्रांती चौक आणि गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन रिक्षा (एमएच २० ईएफ ९८५९) तील जखमी गर्भवती महिला व चालकास उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाला धडक दिल्यानंतर चारचाकी सुमारे ५० मीटर अंतरावर जाऊन उलटली होती. सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके, प्रवीण वाघ, सहायक फौजदार रमाकांत पटारे, विजय निकम यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, अपघातातील जखमी महिला आणि रिक्षाचालक यांची नावे कळू शकली नाहीत.

कारमध्ये दारूच्या बाटल्या; चालकासह चौघे पसार
कारमध्ये दोन महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारची एका महिलेच्या नावावर नोंद असल्याचे समजते. कारमधील चौघेजण गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.

बातम्या आणखी आहेत...