आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभागाच्या गोषवाऱ्यात 931 विद्यार्थ्यांचे स्थलांतर:शिक्षण हमी कार्ड 610 विद्यार्थ्यांनाच, 1374 विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखल्याचा दावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक महिना उशीराने स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षण विभागाच्या गोषवाऱ्यात 931 विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षण हमी कार्ड मात्र 610 विद्यार्थ्यांनाच देण्यात आले असून, 1374 विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखल्याचा दावा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. महिनाभर सर्वेक्षणालाही उशीर करणाऱ्या शिक्षण विभागाने आकडेवारीतील माहिती देण्यासही महिनाभराचा अवधी लावला असून, या आकडेवारीवरदेखील शंका उपस्थित केली जात आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे हंगामी स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 10 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. खरे तर ऑक्टोबरनंतरच कामगारांचे स्थलांतर सुरु होते. परंतु स्थलांतर झाल्यानंतर शिक्षण विभाग आणि प्रशासनाला जागा आल्यानेही या सर्वेक्षणावर टीका झाली.

ऊसतोड मजूर, दगडखान मजूर, वीट भट्टी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार आदींचे व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या स्थलांतरात कुटुंबीयांबरोबर मुले देखील स्थलांतरित होत असतात. या स्थलांतरित मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन ते अठरा वयोगटातील मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणात जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होणारे विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्ह्यात येणारे स्थलांतरित विद्यार्थी यांची नोंद ठेवली जाते . स्थलांतरित विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागात गेले तरी त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळावा व शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

मात्र, आकडेवारीनुसार 931 मुलांचे स्थलांतर झाले परंतु शिक्षण हमीपत्र 610 जणांनाच देण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभागाने जो दावा केला आहे की, विद्यार्थी स्थलांतरित झाला तरी त्याचे शिक्षण थांबणार नाही. तर मग उर्वरित विद्यार्थी शाळेत जात आहेत की नाही यावरबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...