आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलाे इंडिया युवा स्पर्धा:ऋषभ घुबडे, आदिती स्वामीने जिंकले सुवर्ण, नगरच्या पार्थला रौप्य

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) येथे सुरू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. दुपारच्या सत्रापर्यंत झालेल्या स्पर्धेत धनुर्विद्यामध्ये आदिती स्वामी आणि मल्लखांबमध्ये ऋषभ घुबडेने महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक-एक सुवर्णपदक जमा केले.

मल्लखांबच्या हँगिंग पोल प्रकारात चेतन मानखरेने रौप्यपदक आणि धुनर्विद्यामध्ये अहमदनगरच्या पार्थ कोरडेने रौप्यपदक आपल्या नावे केले. महाराष्ट्र सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. यजमान हरियाणा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बॉक्सिंगमध्ये हिमाचल प्रदेशच्या रितुने सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या फ्लायवेट गटात तिने कर्नाटकच्या योगेश्रीला 50-52 गुणांनी पराभूत केले. योगेश्रीला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले.

धनुर्विद्यामध्ये मुलींच्या कंपाउंड प्रकारात आदिती गोपिचंद स्वामीने 13 गुणांनी सुवर्णपदक आपल्या नावे केले. फायनलमध्ये साताऱ्याच्या या खेळाडूने पंजाबच्या अवनित कौरला 144-137 गुणांनी पराभूत केले. अवनितने रौप्यपदक मिळवले.

आंतरराष्ट्रीय खेळाडू पार्थला रौप्य

अहमदनगदच्या पार्थ कोरडेने रौप्यपदक आपल्या नावे केले. अंतिम लढतीत आंध्र प्रदेशच्या खांड्रू व्यंकटने अवघ्या एका गुणांनी पार्थला पराभूत करत सुवर्णपदकाचा वेध घेतला. व्यंकटने 145-144 गुणांनी हा सामना जिंकला. दोन महिन्यापूर्वी मार्चमध्ये फुकेट (थायलंड) येथील जागतीक क्रमवारी धनुर्विद्या स्पर्धा फेज -2 आणि आशिया कप स्पर्धेत पार्थने भारताकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, यावेळी तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. पार्थ प्रशिक्षक अभिजीत दळवी व शुभांगी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठाणच्या धुनर्विद्या प्रशिक्षण केंद्रात सराव करतो.

गतकाच्या खेळाडूंचे सेलूत जोरदार स्वागत

खेलो इंडियामध्ये गतका क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदके जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सेलू रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. पदक विजेत्या संघामध्ये मराठवाड्यातील तेजस्विनी महाजन, सपना खरात, अमृता दिग्रसकर, ॠषिकेश पेटारे या खेळाडूंचा समावेश होता. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

महाराष्ट्राचा दिपीतची उपांत्य फेरीत हार

टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्राचा युवा खेळाडू दिपीत पाटीलला पराभवाचा सामना करावा लागला, त्याचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग झाले. उपांत्य लढतीत दिपीतला पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्यने 4-3 ने पराभूत केले. अंकुरने 11-9, 12-14, 12-10, 11-8, 9-11, 9-11, 9-11 गुणांनी विजय मिळवला. दिपीतचा कांस्यपदकाचा सामना सोमवारी सकाळी दिल्लीच्या आदर्श छेत्रीशी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...