आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षी स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. थाटात सुरू झालेली ही कामे रखडली असून रस्त्यांची संख्या १०७ वरून ६६ पर्यंत घटवण्यात आल्याने कंत्राटदार टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आहे. मनपा प्रशासकांनी याबाबत बैठक बोलावली असून संबंधित अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदारांचे म्हणणे समजून घेतले जाणार आहे.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ३१७ कोटींची तरतूद करण्यात आली. या तरतुदीमधून १०७ रस्त्यांची कामे केली जाणार होती. परंतु, प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर १०७ ऐवजी ६६ रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढून कंत्राटदारदेखील निश्चित करण्यात आला होता. त्याला वर्कऑर्डर देण्यात आली होती. काही कामेदेखील सुरू करण्यात आली होती.
‘स्मार्ट सिटी’ने मुंबई आयआयटी या यंत्रणेला ‘थर्ड पार्टी इन्सपेक्शन’साठी नियुक्त केले आहे. या यंत्रणेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांची कामे केली जात आहेत. प्रत्यक्ष कामे सुरू करण्यापूर्वी ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी अधिकारी आणि कंत्राटदारासोबत स्थळपाहणी केली आणि काही सूचना केल्या. त्यांचे पालन करूनच रस्त्यांची कामे केली जावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
कंत्राटदाराकडून दरवाढीची मागणी याबद्दल प्रशासक डॉ. चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कंत्राटदाराने ‘स्मार्ट सिटी’कडे पत्र दिले असून दरामध्ये वाढीची मागणी केली आहे. निविदेच्या अटींमध्ये भाववाढ देण्याचा मुद्दा समाविष्ट नाही. असे असतानादेखील कंत्राटदाराने मागणी केली आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.