आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात ठिकठिकाणी हाहाकार माजवल्यानंतर बुधवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषत: जालना, हिंगोली, परभणी, हिंगोली, बीड व लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे चित्र आहे. शेतात व गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे व अनेक ठिकाणी रस्त्याचे मोठे नुकसान झाले. वाहतुकीसाठी मार्ग बंद करावे लागले. औरंगाबाद जिल्ह्यातून जळगावकडे जाताना घाटात दरड काेसळल्याने हे मार्ग आधीपासूनच बंद आहेत. आता नागदचा म्हैस घाटही बंद आहे. नांदेडमध्ये नदीकाठच्या भागातील ५८० घरे पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत. तसेच काही जणांची टिनपत्र्याची घरे वाहून गेली आहेत. अशा पूरग्रस्त भागातील २७९ नागरिकांचे महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. नांदेड शहरातील मुख्य गोदावरी नदीवरील गोवर्धनघाट येथील शांतिधाम स्मशानभूमी बुधवारी पाण्याखाली गेली आहे.
औरंगाबाद
- शिवना व ढेकू या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव, उंदीरवाडी, राहेगाव, लासूरगाव येथील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
- शिवना नदीला पूर आल्याने लासूरजवळ दाेन तास नागपूर-मुंबई महामार्ग बंद होता.
- गंगापूर ते लासूर मार्ग सकाळी ८ ते सायं. ६ पर्यंत वाहतूक ठप्प
- कन्नडचा औट्रम घाट व नागदच्या म्हैस घाटात वाहतुकीला मनाई
जालना
- बहिरी नाल्याला पूर आल्यामुळे घनसावंगी तालुक्यातील एकरुखा गावाचा संपर्क तुटला
- काही ठिकाणी नळकांडी पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळेही लोकांना ये-जा करताना अडचणी आल्या.
- अंबड तालुक्यातील सुखापुरीच्या संगमेश्वर नदीला पूर आल्याने तीर्थपुरी ते अंबड हा मार्ग २२ तास बंद हाेता
बीड
- परळी-गंगाखेड, परळी-अंबाजोगाई हे दोन्ही मार्ग मंगळवारी सकाळपासून बंद होते. बुधवारी खुले झाले.
- गेवराईत तलवाडा-सुर्डी-टाकरवण भागातही पुलांवरून पाणी गेल्याने रस्ते बंद होते.
- गोळेगाव हा रस्ता बुधवारीही बंद ठेवण्यात आला.
- गेवराईहून शेवगावकडे जाणारा बंद होता. नंतर सुरू झाला.
परभणी
- जिल्ह्यात छोट्या उंचीचे पूल पाण्याखाली जाऊन ७ ठिकाणी रस्ते बंद
- धानोरा काळे येथे पाणी पुलावरून वाहत असल्याने पालम-ताडकळस व ताडकळस-परभणी रस्ता बंद
- सेलू-वालूर, सेलू-मोरगाव, हदगाव-केदारवाकडी, सेलू
- इरळद या रस्त्यावर जाण्यास मनाई होती.
- गंगाखेड तालुक्यात पूर आल्याने सुनेगाव, मुळी, सायळासह १० गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.
‘सिद्धेश्वर’चे १२ गेट उघडले
सिद्धेश्वर धरणामध्ये पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे बारा दरवाजे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता उघडण्यात आले. यातून १६,०१६ क्युसेकने पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. धरणात सद्य:स्थितीत ९८.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या वरील भागातील येलदरी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तसेच येलदरी धरणातून १९५७९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.