आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड बायपास संग्रामनगर उड्डाणपुलासमोरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाखालचे रस्ते मात्र अजूनही पूर्ण झाले नसल्याने सातारा-देवळाईवासीयांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ८ मार्चपर्यंत काम पूर्ण होईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु ही तारीख उलटून गेली तरी काम पूर्ण झाले नाही. हे काम कासवगतीने सुरू असल्याने रहिवाशांना शहरात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता लवकर खुला न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
बीड बायपासवरील उड्डाणपुलाच्या उंचीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे पुलाखाली खोदकाम करून रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यापूर्वी प्रशासनाने संग्रामनगर उड्डाणपूलमार्गे शहरात येणारा रस्ता बंद केला. पुलाखालचे सर्व रस्तेही बंद केले. केवळ उड्डाणपुलावरूनच ये-जा करावी लागत आहे. ८ मार्चपर्यंत काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु ते पूर्ण झालेले नाही. संथ गतीने काम सुरू असल्याने रहिवाशांना शहरात ये-जा करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय रस्त्यातून वाट काढावी लागत असल्याने अनेकांना पाठीच्या मणक्याचा तसेच मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने काम वेगाने करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
लवकरच रस्ता खुला होईल
पुलाखाली महावितरणची ३३ केव्हीची लाइन होती, तसेच एमआयडीसीची ७०० मिमी व मनपाची १२०० मिमीची पाइपलाइनही होती. त्यामुळे कामात अडथळे येत होते. आता १० दिवसांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. लवकरच काम पूर्ण करून रस्ता खुला करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
आंदोलनाशिवाय पर्याय नाही
केवळ आश्वासन देऊन रहिवाशांच्या जिवाशी खेळण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून रस्त्याचे काम पूर्ण केले जात नाही. आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही.- लक्ष्मण शिंदे, रहिवासी, सातारा परिसर
मानसिक छळ बंद करावा
प्रशासन रस्ता खुला करण्यासाठी वारंवार पुढील मुदत देत आहे. त्यामुळे रहिवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने मानसिक छळ बंद करून रस्ता खुला करावा.- सोमीनाथ शिराणे, अध्यक्ष, संघर्ष समिती
मानेचा, मणक्याचा त्रास सुरू
रस्ता खुला केला नसल्याने मोठा फेरा मारून जावे लागते. रस्ते खराब असल्याने मणक्याचा व मानेचा त्रास सुरू झाला आहे.- राजेंद्र नरवडे, माजी सरपंच
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.