आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नांदेड:वृद्ध दांपत्याला मारहाण करून लुटले, विनायक मंदिराची दानपेटीही फोडली

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमायतनगरमध्ये चोरांचा धुमाकूळ, शेती आखाड्यावर दारूही ढोसली

हिमायतनगर शहरात मंगळवारी अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालून तीन ठिकाणी चोरी केली. त्यात एका वयोवृद्ध दांपत्यास मारहाण करून महिलेच्या अंगावरील दागिने व रक्कम लंपास केली. तसेच वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडली आणि बाजूच्या शेतकऱ्याच्या आखाड्यावर असलेली खते व औषधी लंपास केली.

हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये असलेल्या शंकर नगर भागात दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी मंगळवारच्या मध्यरात्रीला धुमाकूळ घातला. या भागात वास्तव्यास असलेल्या वयोवृद्ध व दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या सुरेश देशपांडे यांच्या घराच्या भिंतीला भगदाड पडून आत शिरून त्यांना मारहाण केली. त्यांची पत्नी शोभाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील झुमके तोडून घेतले. अलमारीतील रक्कम व त्यातील आधार, क्रेडिट कार्डसहित लंपास केले. या घटनेत महिलेचे दोन्ही कान तुटल्याने ती रक्तबंबाळ झाली. हा प्रकार समजताच मध्यरात्रीलाच महिलेला व अंध व्यक्तीस येथील सामाजिक कार्यकर्ते हनुसिंग ठाकूर, रामदास रामदिनवार यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चोरट्यांनी शहराच्या पश्चिमेकडील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. गत चार वर्षांत या मंदिराची दानपेटी जवळपास ५ वेळा फोडली गेली. परंतु अद्यापही पोलिसांना चोरटे हाती लागले नाहीत. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीतर मंदिराच्या शेजारी असलेल्या स.शमशीर स.हमजा यांच्या आखाड्यावरील बैलजोडी सोडून देत आखाड्यावर तळ ठोकून, दारू ढोसून दोन्हीकडे चोरी केलेली रक्कम व दागिन्यांचे वाटे केले.