आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटीची ‘शाळा’:घाटी परिसरातील धर्मशाळेमध्ये रुग्णांची लूट; रूमसाठी आचारी मागतो अतिरिक्त 500 रुपये, गादी, पलंग, चटईच्या नावाखालीही वसुली

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कँटीन मॅनेजर फाडतो रुग्णांच्या पावत्या

मुंबई येथील श्री गाडगे महाराज मिशनच्या घाटी परिसरातील धर्मशाळेत गरीब रुग्णांची सर्रास लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार डीबी स्टार स्टिंगमध्ये समोर आला. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर ही धर्मशाळा चालवली जाते, परंतु येथील आचारी एका रूमसाठी अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी करतो. तर कँटीनचा मॅनेजरच रुग्णांच्या पावत्या फाडत असून गादी, पलंग आणि चटईच्या नावाखाली रुग्णांकडून खुलेआम वसुली केली जात आहे. नेमकी कशी केली जाते गरिबांकडून वसुली याचा पर्दाफाश करत आहोत.

मुंबईच्या श्री गाडगे महाराज मिशनसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने डिसेंबर २०२१ पर्यंत धर्मशाळेचा करार केला आहे. कॅन्सर हॉस्पिटल आणि घाटीमध्ये जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. काहींना अनेक महिने उपचारासाठी थांबावे लागते. असे रुग्ण आणि नातेवाइकांची सोय व्हावी म्हणून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर धर्मशाळेच्या वतीने गरीब रुग्णासाठी स्वस्तात रूम, जेवणाची सोय केली जाते. मात्र, या चांगल्या योजनेला धर्मशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी हरताळ फासला आहे.

पावती फाडणारा कँटीनचा मॅनेजर
धर्मशाळेत पावती फाडण्यासाठी मॅनेजर असणे गरजेचे आहे, परंतु धर्मशाळेला कुणीच वाली नाही. चमू पोहोचला तेव्हा धर्मशाळेची कँटीन ही समता प्रतिष्ठान या संस्थेला चालवण्यासाठी दिल्याचे कळाले. या कँटीनमधील स्वयंपाकी महाराज रूमसाठी ५०० रुपये घेतो, तर बगाडिया नावाचा कँटीनचा मॅनेजर पावत्या फाडताना आढळला.

तत्काळ कारवाई करू
सर्व शुल्क दर करारानुसार घेतले जातात. शिवाय काही बाबतीत आम्ही नाममात्र शुल्क घेतो. मात्र, चुकीच्या पद्धतीने कुणी गरीब रुग्णांकडून पैसे घेत असेल तर आम्ही त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करू. समीर दिघे, संचालक, धर्मशाळा
टेबलावरील माणूस बाहेर गेल्यामुळे मी तिथे बसलो होतो. आम्हालाही कूपन फाडावे लागतात. त्यासाठी येथे बसावे लागते. तुम्ही वरिष्ठांना विचारू शकता. आर. एस. बगाडिया, मॅनेजर, समता प्रतिष्ठान

रुग्णांकडे अतिरिक्त पैशांची मागणी
घाटी रुग्णालय परिसरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला लागून असलेली मुंबईच्या श्री गाडगे महाराज मिशन संचालित धर्मशाळा. (दुसऱ्या छायाचित्रात) चटई देण्याच्या नावाखाली राहिबाई शिंदे यांच्याकडून २०० रुपये घेतल्याची पावती.

निश्चित केलेले दर

  • जनरल वॉर्डात नातेवाइकांना १० रुपये प्रतिदिन
  • खोलीसाठी ६० रुपये शुल्क
  • स्पेशल खोलीसाठी ८५ रुपये. यात टॉयलेट, बाथरूमची सोय.

थेट सवाल - संभाजी घोंगटे, सेक्रेटरी, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई

धर्मशाळेतील कर्मचारी गरिबांकडून अतिरिक्त पैशाची वसुली करतात?
नाही, आमचे नियम ठरलेले आहेत. त्याच पद्धतीने पैसे घ्यावेत असे निर्देश दिले आहेत.

आमच्या पाहणीत तर कर्मचारी रूमसह गादी, पाणी, चटईसाठी अतिरिक्त पैसे वसूल करत होते?
असे होणार नाही. काही लोक आम्ही कंत्राटी तत्त्वावर घेतले आहेत. त्यांनीच काही बदमाशी केली असेल.

समता प्रतिष्ठानचा स्वयंपाकी पैसे मागतो आणि दुसरा पावत्या फाडतो...
याची माहिती घेतो. असे घडले असेल तर आम्ही या लोकांवर कारवाई करू. आमचा उद्देश गरिबांना सेवा देणे आहे.

पहिला दिवस : वेळ दुपारी १ वाजून २५ मिनिटे
श्री गाडगे महाराज मिशन आणि घाटीमध्ये झालेला करार डीबी स्टारच्या हाती आल्यानंतर ग्राहक म्हणून चमूने धर्मशाळेत सलग दोन दिवस पाहणी केली. तेव्हा रूमसह अन्य साहित्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांसोबत झालेला संवाद...
प्रतिनिधी : ८० वर्षांच्या आजीला धर्मशाळेत आणायचे आहे...
कर्मचारी : काही हरकत नाही. घेऊन या, जनरल वॉर्डात शिफ्ट करू.
प्रतिनिधी : आजी खूप आजारी आहेत. आपल्या धर्मशाळेत केअर टेकर मिळेल का? आम्ही पेमेंट करू.
कर्मचारी : हो, विचारून सांगतो. आपल्याकडे भेटून जाईल. (असे सांगत शाळेत काम करणाऱ्या दोन महिलांना विचारणा केली. मात्र, त्यांनी आजीचे डायपर बदलण्यास नकार दिला.)
प्रतिनिधी : आजीला स्पेशल रूम भेटली तर खूप चांगले होईल. मी केअर टेकर बाहेरून आणू शकतो.
कर्मचारी : सध्या रूम खाली नाहीत. तुम्हाला वाट पाहावी लागेल.
प्रतिनिधी : जनरल रूममध्ये काय सुविधा आहेत?
कर्मचारी : तुम्हाला १० रुपये रोज, चटईसाठी १० रुपये, गादी घेतली तर २० रुपये, पलंग घेतल्यास त्याचा १० रुपये रोज पडेल. शिवाय दोन वेळच्या जेवणाचे ३० रुपये प्रतिव्यक्ती द्यावे लागतील.
प्रतिनिधी : तुम्ही प्लीज रूमची व्यवस्था करा. मी वरचे काही लागले तर देतो तुम्हाला.
कर्मचारी : हो का, मी रूमचा बंदोबस्त करून देईल, पण तुम्हाला त्याचे वेगळे ५०० रुपये द्यावे लागतील. निश्चित असेल तर मी साहेबांशी बोलून घेतो.
प्रतिनिधी : बोलून घ्या, मी देतो तुम्हाला पैसे.
कर्मचारी : ठीक आहे. ८५ रुपये रोज असलेली रूम, गादीचे २० रुपये आणि जेवणाचे ३० रुपये असे १३५ रुपये एका व्यक्तीचे लागतील. या घेऊन आजीला.
प्रतिनिधी : केअर टेकर भेटताच घेऊन येतो. मी तुम्हाला फोन करून येतो.

दुसरा दिवस, वेळ : दुपारी २ वाजून २४ मिनिटे
प्रतिनिधी : महाराज नमस्कार.. सॉरी, केअर टेकर भेटला नसल्याने येऊ शकलो नव्हतो.
कर्मचारी : काही हरकत नाही. कधी आणता आजीला?
प्रतिनिधी : रूमचे नक्की आहे ना? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पैसे देतो, पण सध्या मला दोन दिवस आजीला जनरल वॉर्डात ठेवायचे आहे. मी दोन दिवसांचे पैसे भरतो, नंतर तिला रूममध्ये शिफ्ट करू.
कर्मचारी : चालेल, काही हरकत नाही.
प्रतिनिधी : महाराज, मी सध्या जनरल रूम बुक करतो आणि तुम्हाला २०० रुपये देतो. उरलेले पैसे मी आजीला आणल्यावर देतो. चालेल का?
कर्मचारी : ठीक आहे.
अशा रीतीने महाराजने २०० रुपये भरून घेत आजीच्या नावे जनरल रूम बुक करून दिली.

बातम्या आणखी आहेत...