आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली जिल्हयात पिकनुकसानीच्या मदतीसाठी लागणार १५१ कोटी रुपये, ३ लाख शेतकऱ्यांचे झाले नुकसान

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ लाख शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तब्बल १५१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयासह शासनाकडे सादर केला आहे. आता या शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणेची प्रतिक्षा आहे.

हिंगोली जिल्हयात यावर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागले आहे. जिल्हयात अनेक ठिकाणी दोन ते तीन वेळा सोयाबीनची पेरणी करावी लागली आहे. खरीप हंगामात ३.८७ लाख हेक्टरह क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामधे सर्वात जास्त २.५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. या शिवाय कापुस, तुर, उडीद, मुग, ज्वारी या पिकांची पेरणी झाली आहे.

मात्र यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली आहे. तर सतत लागून राहिलेल्या पावसामुळे पिकांमध्ये अंतरमशागत देखील करता आली नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जुन ते सप्टेंबर या महिन्यात वार्षिक सरासरीच्या १२४ टक्के पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकनुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.

प्रशासनाने केलेल्या पंचनाम्या नुसार हिंगोली जिल्हयात ३ लाख ४५३९ शेतकऱ्यांचे ३.८७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये २.२१ लाख हेक्टर जिरायत, २२५ हेक्टर बागायत तर १४२ हेक्टर फळपिके असे एकूण २.२२ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिरायत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १५० कोटी, बागायत पिकांच्या भरपाईसाठी ३०.४५ लाख तर फळपिकांसाठी २५.६० लाख असे सुमारे १५१ कोटी रुपये लागणार आहेत.

या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व शासनाकडे सादर केला आहे. आता या ३ लाख शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या मदतीच्या घोषणेकडे लागले आहे.

ऑक्टोबर महिन्यातही अतिवृष्टीने नुकसान

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानेही अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये झालेल्या पंचनाम्यामध्ये ३२९१ शेतकऱ्यांचे ५१०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी ३.२७ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...