आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक मोहीम:दहा दिवसांत 284 रिक्षांवर आरटीओची कारवाई

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी आरटीओ कार्यालयाने १४ नोव्हेंबरपासून धडक मोहीम सुरू केली आहे. आरटीओ कार्यालयाने गेल्या दहा दिवसांत २८४ रिक्षा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या रिक्षांवर मीटर नसणे, परमिट, फिटनेस-वाहन परवाना, बॅज नसणे आदी विविध कलमांन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, त्यात सातत्य ठेवावे म्हणजे विनापरवाना, परमिट, बॅज नसणाऱ्या चालकांवर कारवाई होईल, त्यातून अनधिकृत चालक समोर येतील, असा सल्ला मनसे वाहतूक शाखेचे शहर संघटक झाकेर पठाण यांनी आरटीओ प्रशासनाला दिला आहे.

रिक्षाचालकांना भाडे वाढवून दिल्यानंतर मीटर अद्ययावत करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मुळात अनेक रिक्षांना मीटरच नसल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. मागील आठवड्यात एका रिक्षाचालकाने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने सिल्लेखाना चौकात रिक्षातून उडी घेतली होती. या घटनेनंतर ही मोहीम तीव्र केली.

रिक्षाचालकांत जनजागृती
नियमानुसार नसणाऱ्या रिक्षा जप्त करण्याची मोहीम सुरू केल्याने रिक्षाचालकांत जागृती झाली आहे. जप्त केलेल्या सर्व रिक्षांच्या मालकांची पडताळणी केली जात आहे. रिक्षाचालकांचा परवाना, वाहनाचे परमिट, बॅज या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे.- संजय मैत्रेवार, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

कारवाईत सातत्य ठेवावे
अनेकदा रिक्षा एकाची, चालवतो दुसराच. त्यातून नको ते प्रकार घडतात. मूळ रिक्षाचालक प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने केवळ काही काळ कारवाई करण्याऐवजी कारवाईत सातत्य ठेवावे. त्यामुळे युनिफॉर्म, बॅज आणि परमिट नसणाऱ्या रिक्षाचालकांना चाप बसेल.- झाकेर पठाण, मनसे वाहतूक शाखा, शहर संघटक

बातम्या आणखी आहेत...