आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिशन व्हॅक्सिनेशन:ड्राय ‘रन’नंतर लसीकरणासाठी धावपळ, 16 जानेवारीच्या मोहिमेसाठी आरोग्य विभाग रविवारीही कामाला; आढावा, नियोजन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणाही लसीकरणासाठी आता सज्ज होत आहे.

ड्राय रन यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यांत १६ जानेवारीच्या लसीकरणाची जोरदार तयारी केली जात आहे. रविवारी सुटी असतानाही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत आढावा, बैठका, नियोजन केले जात होते. किती आरोग्य कर्मचारी-अधिकाऱ्यांना या दिवशी लस द्यायची, किती केंद्रे असणार, तेथील व्यवस्था काय आदी गोष्टींवर चर्चा करून याला अंतिम स्वरूप दिले जात आहे. राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणाही लसीकरणासाठी आता सज्ज होत आहे.

औरंगाबाद: रविवारी डाटा एंट्रीच्या कामाला आली गती
मनपा क्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. त्या अनुषंगाने जोरदार तयारी केली जात आहे. एकूण २४ हजार आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लसीकरण होईल. आतापर्यंत १९ हजार जणांची माहिती अॅपवर अपलोड करण्यात आली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम रविवारी मनपाच्या वॉर रूममध्ये सुरू असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

जालना : शहरी ८, ग्रामीणमध्ये दोन ठिकाणी केंद्रे असणार

आरोग्य संचालकांकडून प्राप्त निर्देशानुसार, जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारीला वेग अाला आहे. रविवारी सार्वजनिक सुटीतही वरिष्ठ अधिकारी लसीकरण मोहिमेच्या नियोजनात व्यग्र होते. दरम्यान, जालना जिल्ह्यातील आठ आरोग्य संस्थांमध्ये हे लसीकरण होणार असून सर्व संबंधितांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात शहरी आठ व ग्रामीण भागातील दोन आरोग्य संस्थांची लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. यात जालना येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, तर भोकरदन, मंठा, परतूर, घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालये ही शहरी, तर प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव (ता. बदनापूर) व प्राथमिक आरोग्य केंद्र खासगाव (ता. जाफराबाद) अशी ग्रामीण भागातील दोन केंद्रे लसीकरणासाठी सुचवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. सर्व आरोग्य संस्थांमधील शीतसाखळीत जवळपास १२ लाख डोस साठवण्याची क्षमता असून पूर्वतयारी सुरू असल्याचे जालना जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी म्हटले आहे.

नांदेड : पहिल्या टप्प्यात १७ हजार जणांना मिळेल लस

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइनवरील जवळपास १७ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. लाभार्थींचा डेटा ‘कोविन सॉफ्टवेअर’वर अपलोड केला आहे. लस ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०८ कोल्ड चेन पॉइंट असून २६२ शीतसाखळी उपकरणे आहेत. यात लस अॅम्ब्युलन्स ३, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ६५ अॅम्ब्युलन्स, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाच्या १७ अॅम्ब्युलन्स, जिल्हास्तरावर वाहनांची व्यवस्था असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी सांगितले.

उस्मानाबाद : पाच केंद्रांवर लसीकरणाच्या तयारीला वेग

जिल्हा पातळीवरही तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने प्रथम १२ केंद्रांची यादी तयार केली होती. परंतु नंतर यामध्ये सुधारणा करून उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह परंडा, उमरगा, तुळजापूर व कळंब या चार उपजिल्हा रुग्णालयांचा कोरोना लसीकरणासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला.

परभणी : वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट

लसीकरणासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे. परभणी येथील शासकीय रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रात व तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रन घेण्यात आला. लसीसाठी जिल्ह्यातील साडेसात हजार शासकीय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, विद्यार्थी, सहकारी कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ताई, मदतनीस, सहायक कर्मचारी तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची माहिती अ‍ॅपवर भरण्यात आली आहे. कोणत्या केंद्रावर लस द्यायची हे आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे ठरवण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

बीड : जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी करणार लसीकरण
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी लस लाँच केली जाईल. यात जिल्हा आरोग्य विभागाकडून ६, तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील ३ ठिकाणे असतील. लसीकरण तयारीसाठी रविवारीही आरोग्य कार्यालय सुरू होते. आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस सुरुवातीला दिली जाणार आहे. जिल्ह्यात सरकारी संस्थांमधील १० हजार, तर खासगी रुग्णालयातील ५ हजार अशा एकूण १५ हजार जणांना लस दिली जाईल. लसीच्या लाँचिंगसाठी जिल्ह्यात ९ ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना राज्याच्या अारोग्य विभागाने दिल्या आहेत. यानुसार आता ठिकाणे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी ६०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी सुटीच्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय सुरू होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांच्यासह इतर कर्मचारी कार्यालयात हजर होते.

हिंगाेली : जिल्हास्तरावर नियोजनाला सुरुवात

जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन केंद्रे असणार आहेत. याशिवाय शहरी भागांमध्ये हिंगोली, वसमत येथे चार, तर कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत येथे प्रत्येकी दोन केंद्रे आहेत. जिल्ह्यामध्ये १४ लाख ५० हजार लस साठवणूक करण्याची क्षमता आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गिते लसीकरणाबाबत नियोजन करत आहेत. रविवारीदेखील लसीकरणाबाबत प्रशासन सज्ज असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...