आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेन-रशिया तणाव:युक्रेनमधून परतण्याची इच्छा, मात्र विमान तिकीट 35 हजारांनी महागले

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैद्यकीय शिक्षण घेत असलेला राजस्थानचा इम्रान खान म्हणाला, तणाव असला तरी युद्धाची परिस्थिती नाही

युक्रेनच्या राजधानीपासून ५०० किमी लांब असलेल्या डेनीपरमध्ये मी वैद्यकीय पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. माझे मूळ गाव राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात आहे. गेल्या सात वर्षांपासून मी येथे आहे. सध्या युद्ध सुरू झाले नसले तरी तणावाची परिस्थिती आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा नाहीत, त्यांना भारतात परतायचे आहे. मात्र, विमान कंपन्यांनी तब्बल ३५ हजार रुपयांनी तिकिटाचे दर वाढवले आहेत. पैशाच्या अडचणीमुळे नाइलाजाने अनेकांना परतणे शक्य नसल्याचे इम्रान खान याने सांगितले.

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने भारतातून दरवर्षी हजाराे विद्यार्थी येतात. डेनीपरमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती नाही. रशियाने स्वतंत्र जाहीर केलेल्या दाेन राज्यांतील ५० टक्के लाेक रशियाचे समर्थक आहेत. याच लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. युक्रेनकडून सध्या तरी कुठलीच कारवाई केली जात नाही. पूर्वी आम्ही दिल्लीतून किंवा युक्रेनच्या राजधानीतून दिल्लीला ५० हजारांत ये-जा करत हाेताे. आता एका बाजूचे तिकीट तब्बल ६० हजार रुपये झाले आहे. त्यामुळे इथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते परवडणारे नाही. भारत सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. मात्र, तिकीट दर प्रचंड वाढवल्याने इच्छा असूनही भारतात परत येणे शक्य नाही. काही विद्यार्थ्यांचे आई-वडील पैशांची तजवीज करत आहेत. यावर भारताने तातडीने ताेडगा काढून विद्यार्थ्यांना परत आणावे.

दहावीनंतर प्रत्येकाला दोन वर्षे लष्करी प्रशिक्षण
औरंगाबादच्या सुनीता लापा गेल्या अनेक वर्षांपासून युक्रेनच्या निप्रोमध्ये राहतात. त्यांचे पती तेथे आयुर्वेदाचा व्यवसाय करतात. युक्रेनच्या काही भागात तणावपूर्ण परिस्थिती आहे. रशियाच्या सीमेपासून त्यांचे शहर अवघे २०० किमी अंतरावर आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती नसली तरी लोकांमध्ये भीती आणि तणाव आहे. युद्ध सुरू झाले तर महागाई वाढू शकते. त्यामुळे गरीब लोक ओट्स खरेदी करून ठेवत असल्याचे त्या म्हणाल्या. सुनीता यांचा मुलगा सध्या दहावीला आहे. त्याची नुकतीच शारीरिक चाचणी झाली. कारण येथे दहावी झाल्यानंतर दोन वर्षेे लष्कराचे प्रशिक्षण दिले जाते. जे तरुण तंदुरुस्त आहेत, अशा सर्वांना सक्तीचे प्रशिक्षण घ्यावे लागते.

महागाई वाढण्याची भीती : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले तर महागाई वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा खाद्यपदार्थांची चणचण भासू नये म्हणून बहुतांश लाेक ओट्सची खरेदी करून ठेवत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ सुरळीत सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी लाेकांना कुठलीही अडचण नाही.

बातम्या आणखी आहेत...