आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादच्या भूमिका शार्दूल आणि श्रुतिका चव्हाण या दोन विद्यार्थिनी युद्धग्रस्त युक्रेनच्या लबीब शहरातून परतीच्या प्रवासासाठी संघर्ष करत आहेत. दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी लबीब शहराजवळ हल्ले सुरू झाल्याने या भागातील विद्यार्थ्यांनी पोलंडच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे उणे ६ डिग्री तापमानात भूमिका आणि श्रुतिकाने ३० किमी पायी प्रवास केला. शरीर गोठवून टाकणाऱ्या तापमानात पायी चालल्यामुळे अनेक मुले चक्कर येऊन पडताहेत, अशी माहिती भूमिकाने दिव्य मराठीला दिली.
गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादेतील दोन विद्यार्थिनींचा युक्रेनमधला संघर्ष दैनिक दिव्य मराठीच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जात आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी परराष्ट्रमंत्र्यांशी याबाबत पत्रव्यवहार केला. शिवाय भूमिका शार्दूलसोबत संवाद साधून लवकरच सुटका केली जाईल, असे सांगत धीरही दिला. मुलींच्या वडिलांनी डॉ. कराड यांची भेट घेत मुलींना मायदेशी परत आणण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मुलींना कुठल्याही सुविधा नाहीत
भूमिकाचे वडील रोहिदास शार्दूल म्हणाले, माझी मुलगी आणि श्रुतिका पोलंडच्या सीमेवर आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी हा प्रवास केला आहे. मात्र, तिथे कोणत्याच सुविधा नाहीत. आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी वारंवार संपर्क करत आहोत. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची आम्ही भेट घेतली आहे.
पोलंडच्या सीमेवर चार किमी रांगा
भूमिकाने सांगितले, आम्ही पोलंडच्या सीमेवर पोहोचलो आहोत. इथे किमान चार किलोमीटर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या केवळ युक्रेनच्या नागरिकांना बाहेर जाऊ दिले जात आहे. भारतीयांना मात्र अद्याप प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण गेटवरच थंडीत कुडकुडत थांबलो आहोत.
भूमिका म्हणाली, लबीब शहरात वातवरण बिघडले आहे. त्यामुळे अडकलेले सर्व भारतीय नागरिक पोलंडच्या दिशेने निघाले. सुरुवातीला ४० किमीचा प्रवास आम्ही टॅक्सीने केला. मात्र, टॅक्सीवाल्यांनी जास्तीचे भाडे आकारल्याने उरलेला प्रवास पायी करण्याचे ठरवले आणि मार्गक्रमण सुरू केले. थंडीमुळे शरीरातील तापमान कमी झाले आहे. अनेक जण आजारी पडत आहेत. इथे खाण्यापिण्याची कोणतीच सोय नाही. शरीर गोठवून टाकणारा हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. सध्या आम्ही प्रवास करणारे जवळपास ५० जण आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.