आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध:युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पैसे देऊन पाणी, रेशन मिळेना; युक्रेनमध्ये अडकलेल्या औरंगाबादच्या दोन मुलींनी सांगितली आपबीत

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘रशियाचा युक्रेनवर बॉम्बहल्ला...’ अशा बातम्या सकाळपासूनच सुरू झाल्या तेव्हा युक्रेनमध्ये तर भीतीचे वातावरण हाेते, पण तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही चिंताग्रस्त हाेते. युक्रेनच्या वेस्टर्न भागात लबीबमध्ये राहणाऱ्या भूमिका शार्दूल आणि श्रुतिका चव्हाण यांच्या औरंगाबादेतील कुटुंबीयांचीही हीच अवस्था हाेती. ‘दिव्य मराठी’ने या दाेघींशी संपर्क साधला असता ‘इकडे भीतिदायक वातावरण आहे. उद्याच्या धास्तीने खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. पेट्रोल पंपापवर रांगा लागल्या आहेत. पाण्याच्या मशीनमधले पाणीदेखील संपलेय,’ असे त्यांनी सांगितले.

औरंगाबादच्या रामनगरमध्ये राहणारी भूमिका वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेली आहे. सध्या तिचे एमबीबीएसचे दुसरे वर्ष आहे. दोन दिवसांनी भारतात परतण्यासाठी तिने दिल्लीचे तिकीट काढले हाेते, मात्र गुरुवारी अचानक सर्व विमाने बंद झाली अन‌् ती तिकडेच अडकून पडली. भूमिकाने सांगितले, ‘युक्रेनची राजधाननी कीव्हला जाण्यासाठी लबीबमधून येथील अनेक भारतीय लाेक मेट्रोने निघाले होते. मात्र युद्ध सुरू हाेताच ट्रेन रद्द झाल्या. त्यामुळे कुणालाही राजधानीच्या ठिकाणी जाता आले नाही. राजधानी कीव्हवर रशियाने मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. आम्हीदेखील हे व्हिडिओवर पाहत आहोत. सध्या ईस्ट भागात कारवाई सुरू आहे. त्यामुळे लोक वेस्टर्न भागात येत आहेत. कदाचित याच भागातून विमानाने भारतीयांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.’

विमानतळावर तुडुंब गर्दी : युद्धाच्या धास्तीने सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला काही दिवस पुरेल एवढे रेशन खरेदी करत आहे. इथे पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. विमानाचे तिकीटदेखील महागले आहे. सध्या कीव्ह विमानतळावर भारतीयांची माेठी गर्दी दिसून येते, यात विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे.

पाणी मिळणेही बनले अवघड
औरंगाबादची श्रुतिका चव्हाणही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गात शिकते. ती व भूमिका एकाच हाेस्टेलमध्ये राहतात. श्रुतिकाने सांगितले, ‘माझे सहा मार्चचे तिकीट बुक झाले होते. मात्र विमाने रद्द झाल्याने मायदेशी परतता येत नाही. घराबाहेर पडू नका, विमानतळ, रेल्वेच्या ठिकाणी थांबू नका, अशा सूचना येथील प्रशासनाने दिल्या आहेत. सगळेकडेच तणावाचे वातावरण आहे. इथे पाणी विकत घ्यावे लागते, सकाळपासून त्यासाठी माेठी गर्दी हाेती. इथे पाण्याच्या मशीन असतात. सर्वांनीच गर्दी केल्याने त्यातील पाणीही संपले आहे. आम्हाला विद्यापीठाने रात्री दहानंतर होस्टेलमधून बाहेर न पडण्यास सांगितले आहे.’

मुली अडकल्याने आम्हाला चिंता
युक्रेनमध्ये मुली अडकल्याने आम्ही तणावात आहाेत. दूतावासाशी आम्ही संपर्क केलाय. विमाने केव्हा सुरू होतील याकडेच आमचे लक्ष आहे. सतत फोन सुरू आहेत. - रोहिदास शार्दूल, भूमिकाचे वडील

सतत लक्ष टीव्ही, फाेनकडे
माझ्या मुलीचे सहा तारखेला तिकीट बुक होते. मात्र आता विमाने रद्द झाली आहेत. आम्ही टीव्हीवर लक्ष ठेवून आहाेत. तसेच मुलींना फोन करून त्यांची माहिती घेत आहोत. युद्धामुळे तणावाचे वातावरण आहे. - हेमंत चव्हाण, श्रुतिकाचे वडील

बिडकीनचा भावी डॉक्टर अजिंक्यसह भारतातील 1200 विद्यार्थी अडकले
डॉ. शेखर मगर | औरंगाबाद

बिडकीनचा अजिंक्य नंदकिशोर जाधव हा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला आहे. उझगोरोद नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या (एमडी) द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ८ मार्च २०२२ रोजीच्या फ्लाइटमध्ये त्याचे तिकीट बुक होते. मात्र ते विमानच रद्द करण्यात आल्याने त्याचे आई-वडील चिंतेत आहेत.

पैठण रोडवरील फारोळा या छोट्याशा गावचा अजिंक्य हा मूळ रहिवासी आहे. वडील नंदकिशोर आणि आई यशोदा यांच्याकडे ४ एकर शेती आहे. त्यांना दोन मुले असून अजिंक्य युक्रेनमध्ये आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ७ मार्च २०२१ रोजी तो युक्रेनला गेला होता. आता तिकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे उझगोरोद नॅशनल युनिव्हर्सिटीने तासिका ऑनलाइन केल्या आहेत. अजिंक्यने भारतात येण्यासाठी ५० हजार रुपये देऊन कतार एअरवेजचे ८ मार्चचे तिकीट काढले हाेते. पण युक्रेनने सर्व विमाने रद्द केली आहेत, त्यामुळे ताे मायदेशी येऊ शकत नाही. ‘परिस्थिती आणखीच चिघळली तर काय होईल..?’ या चिंतेत त्याचे आई-वडील आहेत. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने अजिंक्यशी संपर्क साधला. तो म्हणाला, ‘ प्रथम वर्षात अंदाजे दहा तर द्वितीय वर्षात ६ जण शिक्षण घेत आहेत. हा सहा वर्षांचा अभ्यासक्रम असून प्रत्येक वर्गात किमान ५-६ विद्यार्थी आपल्या राज्यातील आहेतच. संपूर्ण भारतातून किमान बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत किमान दीड हजार विद्यार्थी भारतातील आहेत. मी माझ्या मित्रांसोबत आधी दिल्लीत येण्याचा प्रयत्न करत आहे. ’

मोदींच्या निर्णयाकडे आमचे लक्ष
अजिंक्यचे वडील नंदकिशोर म्हणाले, ‘ अजिंक्यचे शालेय शिक्षण एमआयडीसी पैठण येथील सेंट पॉल शाळेत झाले आहे. त्याची आम्ही आता प्रतीक्षा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणारच आहेत,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मदत हवीय, इथे साधा संपर्क
औरंगाबाद जिल्ह्यातील ज्यांचे नातेवाईक युक्रेनमध्ये अडकले असतील त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२४०- २३३१०७७ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. तसेच दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयातील १८०० ११८७९७, ०११- २३०१२११३, ०११- २३०१४१०४, ०११- २३०१७९०५ यांच्याशी संपर्क साधता येईल.

बातम्या आणखी आहेत...