आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तस्करी:अडीच हजार रुपये पार्सल भाडे भरून सचखंडने पाठवला 81 लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू

नांदेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेड येथे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, पार्सलवर सलमान, राजू, शकील अशी तिघांची नावे

लाॅकडाऊनच्या काळात सीमावर्ती भागात होणारी पोलिसांची कडक चेकिंग, राज्यात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूवर अन्न आणि औषध प्रशासनाची असलेली नजर यामुळे गुटखा माफिया गुटखा विक्रीसाठी नव्या नव्या वाटा शोधत आहेत. गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूच्या तस्करीसाठी गुटखा माफियांनी आता केंद्र सरकारच्या मालकीच्या रेल्वेचाच आधार घेतला. दिल्लीहून नांदेडला येणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसमधून रेल्वे पोलिसांनी ८१ लाखाचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे दिल्ली येथून केवळ अडीच हजार रुपये पार्सल शुल्क भरून हा सुगंधित तंबाखू नांदेडला पाठवण्यात आला.

गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर राज्यात बंदी आहे. त्यामुळे पोलिस आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी गुटखा विक्रेते, साठेबाज यांच्यावर वारंवार कारवाई करीत आहेत. लाॅकडाऊनमध्ये राज्याच्या सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त असल्याने गुटख्याची वाहतूकही जवळपास ठप्प झाली. त्यामुळे बाजारात गुटखा दामदुप्पट भावाने विक्री होत होता. राज्यात गुटख्यावर तसेच सुगंधित तंबाखूवर बंदी असली तरी गुटखा खाणारे मात्र कमी झाले नाहीत. त्यामुळे मिळेल त्या भावात गुटखा खरेदी करून ते तलफ भागवत हाेते. गुटख्याची मागणी लक्षात घेऊन परराज्यातील वितरकही गुटखा वितरणासाठी नव्या नव्या वाटा शोधताना आढळून आले. इतर मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पोमध्ये गुटखा लपवून पाठवला जात आहे. परंतु आता गुटखा वितरकांनी त्या पुढची पायरी गाठली आहे. लाॅकडाऊनमुळे रेल्वे वाहतूक ठप्प होती. परंतु आता काही विशेष गाड्या रेल्वेने सुरू केल्या. त्यात सचखंड एक्स्प्रेसचा समावेेश आहे. सध्या पंजाबातील आंदोलनामुळे ही रेल्वे नांदेड-दिल्ली अशी सुरू आहे. दिल्लीतील कंपनीतर्फे याच रेल्वेच्या पार्सलमधून तब्बल ८१ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू पाठवल्याची धक्कादायक घटना उजेडात आली. गुरुवारी रात्री रेल्वे पोलिसांना सचखंड एक्स्प्रेसने पार्सलद्वारा गुटखा पाठवला गेल्याची खबर रेल्वे पाेलिसांना मिळाली. त्यानंतर रात्री उशिरा रेल्वे पोलिसांनी पार्सल विभागात जाऊन झाडाझडती घेतली असता दिल्ली येथून अमित कार्गो कंपनी आणि मोहम्मद अमजद या दोघांनी पाठवलेल्या पार्सलमध्ये तब्बल ८१ लाखांचा तंबाखूजन्य ऐवज आढळून आला. यात सुगंधित तंबाखू व सिगारेटचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे पार्सल सलमान, राजू, शकील अशा तीन नावांनी पाठवण्यात आले. त्यावर पार्सल घेणाऱ्याचे पूर्ण नावही नाही. या पार्सलमध्ये रत्ना जर्दा, सिगारेट व इतर सुगंधित तंबाखूचा समावेश आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती रेल्वेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.

पहिल्यांदाच माेठी कारवाई

राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीहून केवळ अडीच हजार रुपये पार्सलचे भाडे भरून वितरकाने ८१ लाखांचा माल नांदेडला पाठवला. हा सर्व प्रकार पाहून रेल्वे प्रशासनही अचंबित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...